शाळा.. मिलिंद बोकिल यांच्या कांदबरीवर अधारित असलेला आणि सुजित डहाके यानं दिग्दर्शित केलेला शाळा पाहिला.. आणि मन पुन्हा एकदा नववी-दहावीत असताना असलेल्या वर्गांमध्ये डोकावलं..
सर्वात पहिल्यांदा असा सुंदर सिनेमा केल्याबाबत मी सर्व शाळाच्या टीमचे मनपूर्वक आभार मानतो.. कादंबरीला साजेशी पात्र.. लोकेशन्स.. कुठलाही शहरीकरणाचा लवलेश नाही.. आणीबाणी.. विशेष करुन शिरोडकर आणि जोशी यांचं हुबेहुब चित्रण कादंबरी हुकुमाबरोबर पहायला मिळाल्यानं मन खूपं सुखावलं.. जोशी जर हिरोसारखा दिसला असता आणि शिरोडकर थोडी बावळट दिसली असती, तर सिनेमा गडबडला असता.. पण सगळ्याच पातळ्यांवर कादंबरी आणि पात्ररचनेचं भान सांभाळण्या-या सगळ्याचच टीमचं म्हणूनच अभिनंदन.. पुन्हा एकदा शाळा आठवून दिल्याबाबत धन्यवाद.. आता सिनेमाबाबत न लिहिता शाळेबाबत लिहितो..कारण त्याचं कौतुक होईलच मूळ विषय बाजूला पडेल..
माझं शिक्षण पुणे जिल्ह्यात घोडेगाव या गावी झालं..सन साधारण 1984 ते 1994.. 94ला मी दहावी झालो.. या संपूर्ण काळात असलेल्या आठवणींचा त्यातही शाळेसंदर्भातल्या आठवणी एकवटण्याचा हा प्रयत्न.. सुरुवातीला जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा... या ठिकाणी ब्रिटिशांनी बांधलेल्या एका अद्ययावत पोलीस ठाण्यात आम्हाला प्राथमिक शिक्षणाचे धडे मिळाले.. त्यात लक्षात राहिलेले दोन मास्तर.. मुलांचीच शाळा असल्यानं मुली हा प्रकार नव्हताच.. बो-हाडे नावाचे आमचे शिक्षक होते तिसरीला.. वर्गात एखादा मुलगा पाठांतरात चुकला तर, त्यांनी धपाटा घातल्यावर, तो मुलगा जागच्या जागी मुतायचा.. कल्पना करा.. मी हे अनुभवलयं.. पण त्यांचा माझ्यावर माझ्या हुशारपणामुळं जीव होता.. त्यांचं एक मोठं ऑपरेशन होतं.. मला तिसरीच्या वयात काय कळत असणार.. पण त्यांनी मला बाजूला नेऊन परिस्थिती काय ते सांगीतलं होतं.. तेव्हा आमची शाळा बिस्मिल्ला बोर्डिंगमध्ये भरत असे.. ही आमच्या त्या ब्रिटीशांच्या काळाच्या असलेल्या मुख्य बिल्डिंगपासून थोड्या अंतरावर होती.. आणि मुस्लिम परिसरात भरत असे.. त्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर मुख्य शाळा होती.. त्यानंतर आमची चौथीत रवानगी मुख्य बिल्डिंगमध्ये झाली.. त्या वाटेवर मुलींची शाळा होती.. पण तेव्हा फारसं काही कळत नसे.. चौथीला आम्हाला सुरुवातीला पठाण नावाचे गुरुजी होते.. पण त्यांची शिकवण्याची पद्धत वेगळी होती.. काही दिवसांनी आम्हाला एका तासाला भवारी नावाचे गुरुजी रिप्लेसमेंटला आले.. त्यांनी एक कविता साभिनय शिकवली.. बास.. आम्ही त्यांच्या प्रेमात पडलो.. तेच मास्तर हवेत असा आम्ही घोषा लावला.. मग अखेरीस ते आमच्या वर्गात पडले.. या माणसानी आमच्यावर खूप कष्ट घेतले.. त्यांनी वर्गातली पहिली पाच हुशार मुलं निवडली.. चाचणी परिक्षांतून.. त्यांना घरी ते फुकट मार्गदर्शन करायचे.. त्याचबरोबर प्रार्थना ( केशवा माधवा ते पार हनुमंताच्या सुता..) आता या प्रार्थना फारशा ऐकिवातही नसतील पण त्यांनी त्या आमच्या सुरावर बसवून घेतल्या होत्या.. ते पार शेण सारवण्यापर्यंत.. हा एक मोठा किस्साच होता.. आता हसू येतं.. पण महिन्यातून एक दिवस आम्हाला गावभरातलं शेणं गोळा करावं लागे.. मग ते वर्गात आणून वर्ग सारवावा लागे.. त्याच्यातही क्रम असे.. विशेषत सधन कुटुंबातल्या मुलांनी हे काम चांगलं करावं यासाठी या गुरुजींचा आग्रह असे.. त्यातही पहिल्या पाच मुलांवर त्यांचं या कामातही विशेष लक्ष असे.. त्यांच्या घरच्या शिकवण्यांमुळं मी चौथीच स्कॉलरशीप मिळवू शकलो.. पण त्यांची परतफेड करता येऊ शकली नाही.. त्यांचीही स्वत: ची दोन मुलं.. तीही हुशार होती.. पण नंतरच्या काळात आम्ही हायस्कूलला गेलो आणि सगळा सूरच बदलला..
आता मुख्य शाळेविषयी.. आम्ही पाचवीत पहिल्यांदा हायस्कूलात प्रवेश केला.. जनता विद्या मंदिर.. असं या शाळेचं नाव.. प्रशस्त दुपदरी पसरलेली बिल्डिंग.. मध्ये मोठ्ठी प्रयोगशाळा कम सेंट्रल हॉल... मोठ्ठ ग्राउंड.. ही आमच्या मनात घर करुन राहिलेली शआला.. तेव्हा दडपण होतं.. एक तर मुलामुलींची पहिली एकत्र शाळा.. मुलानं मुलीशी बोलणं हे पाप समजलं जाई.. त्या काळी.. म्हणजे साधारण 1988 ते 1994 सालापर्यंत... त्यातही प्रत्येक तासाला वेगळे शिक्षक.. हे यापूर्वी कधी नव्हंत.. एकच मास्तर किंवा बाई असायच्या .. त्याच शिकवायच्या.. मध्ये कंटाळा आला तर त्यांची शिक्षकांची स्वतची वेगळी पार्टी असायची.. त्यात कधी पोहे, कधी भेळ.. कधी वेगळाच पदार्थ असायचा.. आम्हालाही तेवढाच आराम मिळत असे.. त्यात नव्या शाळेत इंग्रजी.. या विषयाची एक वेगळी दहशत होती..ती खोटं का बोला आजही आहेच.. त्यात प्राथमिक शाळेतच असलेल्या दुस-या वर्गातून आलेली मुलं ( म्हणजे आम्हाला समांतर एक वेगळा वर्ग चालत असे) .. ही मुलं संख्येनं जास्त होती.. त्यामुळं त्यांची दादागिरी असे.. दुस-या बेंचवर बसण्यासाठी आमची भांडणं झालेली मला आठवतं.. त्यावेळी वाघमारे नावाचे आमचे क्लास टिचर होते.. त्यांनी हे भांडण मिटवलं.. नशिबानं त्याच्या आधी दोन तीन दिवस स्कॉलरशीपचा निकाल लागलेला त्यांनी विचारलं साखरे कोण म्हणून मी हात वर केला.. तेव्हा तालुक्यात मी आणि माझ्या एका जवळच्या मित्राला स्कॉलरशीप मिळालेली.. त्याचं नाव होतं संतोष खंडू घोडेकर.. त्याला आम्ही वर्गात खंडू म्हणायचो.. आमची चांगली मैत्री होती.. मी त्याच्या घरी जायचो.. त्याचं घरं एकदम लहान होतं.. त्यांच्याकडं एक शेळी होती.. तिला घेऊन आम्ही रानात तिला चरायला न्यायचो.. कितीतरी वेळा.. पण एक दिवस मी त्याला खंडू म्हणतो म्हणून त्याचं आणि माझं भांडण झालं.. आणि हा मित्र कायमचा दुरावला.. तो आजतागायत.. हायस्कूलात तो ‘ब’तर मी ‘अ’ वर्गात गेलो..
अ वर्गात जाण्यामागे कारण होते पाथरवट सर .. हे संघाचे चांगले कार्यकर्ते.. आणि शाळेचे पर्यावेक्षक आणि नंतर उपमुख्याध्यापक.. आमचे बाबाही संघाचे कार्यकर्ते.. त्यामुळं अनेकदा संघाच्या कार्यक्रमात ते एकत्र असत.. त्यांची आणि जवळपास 5 ते 6 शिक्षकांच्या मुली आमच्या वर्गात होत्या.. हे खूप नंतर कळलं.. आणि कॉम्पिटिशीन वाढली.. म्हणजे अभ्यासात सिद्ध करायचं तर या सगळ्यांना मात देणं गरजेचं होतं.. त्यातही कॉलेजचे की शाळेचे पर्यवेक्षक असलेले कुलकर्णी सर त्यांचा मुलगाही आमच्याच वर्गात होता.. मी ब-याचदा शनिवारी मधल्या सुट्टीत त्याच्याकडं जात असे.. ही सगळीच मंडळी हुशार होती.. त्यामुळं तगून राहण्यासाठी अभ्यास करणं भागच असे.. याचबरोबर बाकीचीही अनेक मित्रमंडळी सोबत होती.. कित्येकांच्या घरी ते माळावर भाजी-भाकरीसह..कोड्याससह अनेक आठवणी आजही कित्येकदा मनात भुंगा घालतात..
(क्रमश:..)
0 comments:
Post a Comment