Sunday, November 13, 2011

मनाचा ठाव घेणारं 'देऊळ'







आत्तापर्यंत धर्म आणि देव याबाबत जाहीर घेण्यास कुचराई करणा-या महाराष्ट्रात असा एक मराठी चित्रपट निर्माण व्हावा... ज्यानं आपल्या श्रद्धेलाच तडा जावा.. असा काही अनुभव मला काल 'देऊळ' सिनेमा पाहताना आला.. बरं फक्त एवढचं याचं वैशिष्ठ्य नाही.. ग्रामीण महाराष्ट्र.. त्यातला बरोजगार युवक.. त्याच्या रिकाम्या वेळाचा राजकारणी आणि इतर अविवेकी गोष्टींच्या माध्यमातून होणारा दुरुपयोग.. सिनेमाच्या फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफमध्ये जाणवणारे विरोधाभास.. अंगावर येणारं आणि कुणाच्याही विरोधात नसलेलं दत्ता दिगंबरा हे गाणं.. आमदार, स्थानिक पुढारी यांच्या वरचष्म्यात असलेली उदा. सरपंचांची भूमिका.. अण्णांसारख्या तत्ववेष्ट्याची सिनेमातली मनाला स्पर्शणारी मात्र अचानकपणे गायब होणारी भूमिका.. नायकाचा आक्रोश अशा कितीतरी गोष्टी ज्या कधीच विसरु शकणार नाहीत अशा..
सर्वात पहिल्यांदा अशा संवेदनशील विषयावर कुणालाही न दुखावणारा (अगदी देवही निवडून घेतलेला) असा चित्रपट इतक्या धीटपणे सिनेमात मांडणा-या सर्वच टीमचं मी मनापासून कौतुक करतो.. दुसरं अप्रतिम कास्टिंग.. कुठल्या भूमिकेसाठी कोण माणूस आणि तोही मराठीतला सर्वोच्च असाच हे निवडण्याबाबत धन्यवाद.. खरं सांगतो मनापासून गेल्या कित्येक वर्षांत म्हणजे माझ्या आठवणीत सुमित्रा भावे आणि सुनील सुखथनकर यांच्या 'वास्तुपुरुष' नंतर खरचं ताकदीचा सिनेमा असं ज्याचं वर्णन करता येईल तो देऊळ.. ज्यात केवळ आशय नाही.. नैमत्तिक नाही.. अनेक जुन्या रुढी उलगडणारा अनेक नवं संचित देणारा असा सिनेमा.. व्वा व्वा.. क्या बात है !
आता मुख्य सिनेमाविषयी .. अगदी पहिल्या फ्रेमपासून अगदी नावं सुरु होण्यापासून ते अगदी शेवटच्या मूर्ती विसर्जनापर्यंत आणि त्यानंततरच्या शांततेत साकारलेल्या काही निसर्गाच्या फ्रेमपर्यंत हा सिनेमा तुम्हाला घट्ट धरुन ठवतो.. कथानकाची सुरुवात..गिरीष कुलकर्णींचा वळूप्रमाणेच सरस अभिनय.. त्याचा त्याच्या गाईसाठी तुटणारा जीव.. गाव.. त्यातली बेरोजगार मंडळी.. नाना.. त्याची बायको सोनाली.. त्याचा महत्वाकांक्षी पुतण्या.. त्यांचा बिनकामाचा पण काहीतरी कार्यक्रमाच्या शोधात असणारा ग्रुप.. त्यातला कवी.. पत्रकार.. फाट्यावर असणारं मात्र गावापासून लांब असणारं त्यांची ती नेहमीची टपरी.. मोबाईलच्या रिंग टोन्स.. मोबाईलवर सुरवातीला लांबूनच बोलतानाची नानाच्या पुतण्याची सवय.. त्याची साजनची रिंगटोन.. त्याचं एज फ्रेंड, एज सरपंच, एज गावकरी ही स्टाईल.. ट्रिपल सीट सर्रास होणारा प्रवास.. त्या मंडळींचं समरसून बीपी पहाणं.. त्यातला बेव़डा मास्तर.. त्याची त्याच्या बायकोशी मुलासाठी होणारी होणारी जुगलबंदी.. बायको रडायला लागल्यावर त्याची होणारी घालमेल.. गिरीषची आई.. त्याची प्रेयसी.. त्यांचे एकमेकांशी असलेले विनोदावर जाणारे पण प्रत्यक्षात श्रध्देवरच अघात करणारे सवाद.. त्यात सुंदर पावा वाजवणारे आणि गावापेक्षा अधिक माहिती आणि सखोल असेलेले अण्णा.. गिरीश आजारी पडला असताना त्याच्या डोक्याशी येऊन तोच तोच संवाद साधणा-या बायकांचा स्वभावविशेष.. गावातल्या महिला सरपंचांची प्रत्यक्ष स्थिती.. झेंडावंदनाला होणारी धावपळ.. सरपंचावर स्थानिक नेत्यांचा आणि आमदारांचा स्थानिक नेत्यांवर असलेल्या प्रभाव.. ग्रामीण भागात पत्रकारांची मोठी आणि आर्थिक हितासाठी असलेली भूमिका.. हे सर्वच त्यांच्या त्यांच्या पात्रांची सखोल ओळख , ग्रामीण महाराष्ट्रतलं अस्सलं जीवन.. त्यातलं नैराश्य.. आशेचे किरण... याचा धगधगता प्रवास पण काहीसा विनोदाच्या अंगानं जाणवणारा प्रवास पहिल्या सत्रात घडतो..
एका साध्याभोळ्या माणसाच्या दृष्टीकोनाचा राजकीय फायदा घेण्यासाठी मंदिर बांधण्याचा निर्णय झाल्यानंतर दुस-या पर्वात गावात आलेला बाजारीपणा.. मोबाईलच्या रिंगटोन्स ते घरातलं सामान.. कपडे.. फर्निचर.. बांधकाम.. बाजारीपणामुळं आलेला निगरगट्टपणा.. गावक-यांची हरवलेली शांतता.. कुटुंबात आलेला व्यावसायिकपणा.. हे सगळं दुस-या पर्वात छान जाणवून जातं.. त्यातही अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यानं हा फरक अगदी स्पषटपणे जाणवत राहतो.. गिरीषचं करडी गायीवर असणारं प्रेम.. तिचं या धंद्याच्या नादात देवात झालेलं रुपांतर यानंतर त्याचा होणारा उद्वेग. तिच्या देखभालीसाठी त्याचा तुटणारा जीव.. आणि या पार्श्वभूमीवर हे सगळं सत्य समोर येत असताना दत्ता दिगंबरा हे गाणं.. अगदी अंगावर आल्याशिवाय राहवत नाही..
याचा अर्थ सिनेमात हे सगळं रचणा-या मंडळींना कुणी खलनायक म्हणू शकत नाही.. त्यांच्या आणि गावाच्या विकासासाठी ही त्यांची योग्य भूमिका असल्याचा नाना आणि दिलीप प्रभावळकर यांचा संवाद.. अण्णांच्या भूमिकेत असलेल्या दिलीप प्रभावळकरांची तगमग.. शेवटी देवालाच कोंडल्यामुळं आणि करडी गायीच्या वियोगानं घायाळ झालेल्या गिरीषचा एकतर्फी संघर्ष.. त्याला वेडाच्या भरात भेटलेला नासीर.. व्वा व्वा त्या भूमिकेसाठी नासीरची निवड करण्याचं दाखवलेलं वेगळेपण.. त्याचं मूर्ती घेऊन पसारं होणं.. त्याचा देवाशी साधलेला भाबडा पण मोलाचा संवाद.. आणि मूर्ती विसर्जनावेळी दुसरीकडं होत असलेली मूर्तीची नवी प्रतिष्ठापना.. म्हणजे आता बाजार सुरुच राहणार .. याचा जाणारा संदेश.. आणि दुसरीकडं भाबड्या गिरीषच्या मनातल्या श्रद्धेचं, देवाचं झालेलं विसर्जन.. हे सगळचं तुम्हाला अंतर्मुख करायला लावणारं आहे.. एकीकडे गोंगाट.. एकीकडं शांतता.. मात्र तीही सखोल तत्ववेत्त्यासारखी.. वा.. बहोत खूब..
या सिनेमात एवढे दर्जेदार अभिनेते असूनही कुणाचा एकट्याचा अभिनय लक्षात राहत नाही.. याचं कारण टीम वर्क.. आणि प्रत्येक भूमिकेला मिळालेलं परफेक्ट स्थान.. सिनेमा संपल्यानंतर एक वेगळीच अंतर्मुख करणारी, आपल्या श्रद्धांना तडा देणारी.. त्यावर उपहासात्मक विडंबन म्हणून कुठेतरी आत विचार करायला लावणारी( प्रत्येचाच्या कुवतीनुसार ) प्रोसेस घेऊनच प्रेक्षक बाहेर पडतो.. आणि मला वाटतं हेच या सिनेमाचं यश आहे..
या संघर्षात तुमची घालमेल होते, तुम्ही रडता.. हसता.. पण तुम्हाला आत हे कुठेतरी अंतर्मुख करत रहातं.. आपल्या आजूबाजूला आणि आपणही काय करतोय याची जाणीव होत राहते.. हेच याचं गमक आहे.. सध्याच्या धावपळीच्या जगात आणि स्वतंत्र कुटुंबाच्या पद्धतीत कामातही शांतता मिळत नसताना, जगण्यातली धावपळ आणि गुंता सडवण्यासाठी आम्ही नवी सोफिस्टिकेटेड उपाय शोधून काढलेत.. आम्हाला मानसिक शांततेसाठी माऊली, तुकामाई किंवा पंढरपुरात जाण्यापेक्षा शिर्डी, शिंगणापूर, अक्कलकोट, गोंदवले, शेगाव, बांद्रा असे आमचे आम्ही उपाय शोधून काढलेत.. त्याच्यावर जाऊन अनेक बुवाबाजांची संगत आहेच.. त्यात लालबाग, सिद्धीविनायक, दगडूशेट साराख्यांची भर आहेच.. याशिवाय काशी, अयोध्या. प्रयाग, चार धाम, बारा ज्योतिल्रिंग, अष्टविनायक, अमरनाथ, लागलचं तर वैष्णोदवी, मानससरोवर.. याप्रत्येक तिर्थक्षेत्री जाऊन शांतता शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.. प्रत्यक्षात मात्र वास्तव काय आहे हे पाहण्याकडं आमचा कल नाहीच.. मग अशा अशांततेत तुमच्या मनातल्या श्रद्धेवरच प्रघात करणारा सिनेमा देऊन नक्कीच अनेक रंगांनी , उत्तम कलाकृती म्हणून , उत्तम आशय म्हणून अतिशय समृद्ध आहे.. एवढी हिम्मत दाखवून तुम्ही हे मांडलत.. त्यासाठी कष्ट घेतलेत.. हेच माझ्यासारख्या गरीब पामर मराठी प्रेक्षकासाठी समाधानाची बाब आहे.. म्हणून संपूर्ण टीमला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद..