काहीतरी नवं सुचावं, वाचावं, पहावं, असं वाटेनासं झालय.. काय म्हणायचं याला.. सॅच्युरेशन की आळशीपणा की आणखी काही..
लायब्ररीत पुस्तकांच्या गर्दीत हरवलो, तरी काहीतरी सुंदर हाती गवसताना दिसत नाहीये.. सिनेमा, टीव्ही, नाटकं यांचंही थोड्याफार फरकानं तेच झालय आणि जेवणातही तेच..वैविध्य..छान असं काही सापडत नाहीये..
प्रवासही फारसे होत नाहीयेत.. बाहेर उन्हाने जीव घातो की काय, असं वाटू लागलय..
आणि शेवटचं ज्या कामासाठी आपण जगतो.. ते काम करतानाही त्यात तोच तोच एकसूरीपणा येऊ लागलाय..
काय म्हणायचं याला.. काही चांगलं आजूबाजूला उत्साहवर्धक का घडत नाहीये.. की खरोखरच जगण्यातलं सर्जन नाहीसं होत चाललय... म्हणजे ही सर्वाधिक भिती आहे की आपण बनचुके होत चालले आहोत..
माणसं, नाती यांच्याबाबतही असंचं काहीसं का व्हावं..
चांगली निर्मीती आणि आशयघनता नसल्याने चांगलं पहायला, वाचायला मिळत नाहीये का.. की आपण जे चांगलं आहे तिथपर्यंत पोहचत नाहीयोत. काहीच कळेनासं झालय..
ज्या चळवळीतून आपण मोठे झालो, माणसांसाठी काम कारवं असं सतत वाटत राहिलं ती माणसं आता आजूबाजूला का नकोशी वाटायला लागली आहेत..
काय नक्की काय बिघडलंय काय..
की आपलं जगण्यावरचं प्रेमचं हळूहळू कमी होत चाललय.. आला दिवस ढकलायचा, ऑफीसातनं बाहेर पडताना संपला एक दिवस आणि नंतर उद्याचा आणि नंतर परवाचा.. ही भावना का मनात येऊ लागलीय.
उत्तर देणारेही संपेलत आणि ज्यांच्याशी संवाद व्हावा अशी माणसंही राहिलेली नाहीत.. कदाचित यालाच मोठं होणं म्हणत असावेत..
नवं ध्येय सापडावं, काहीतरी नवं करावं असं सारखं वाटतय, पण पुन्हा तेच काही दिसत नाहीये..
भिती वाटतेय की, आपण म्हातारे होऊ लागले आहोत..
No comments:
Post a Comment