Wednesday, September 2, 2015

जयहिंद साब !



धागा शौर्य का, राखी अभिमान की, या झी 24 तासच्या उपक्रमाच्या समारोपाच्या निमित्तानं काश्मीरात चार दिवस होतो. त्या निमित्तानं सैन्यदालाचं अंतरंग पाहता आलं, आपण मुंबई, पुणे, नाशिक, नागपुरात वास्तव्यास असताना आपण नेहमीच आर्मीच्या वसाहती पाहत आलो, मग त्या ख़डकी, असो वा देवळाली असो, आपण नेहमीच हे जग भिंतीच्या बाहेरुन पाहिलय, पण मी जेव्हा काश्मीरमध्ये जाऊन हे जग आतून पाहिलं, तेव्हा हे जग वेगळचं आहे, या निष्कर्षावर येऊन मी ठेपलो.
सैन्याच्या म्हणजेच रुढार्थाने प्रचलित असलेल्या आर्मीच्या वातावरणात गेल्यानंतर जाणवली ती शिस्त. स्वावलंबन, देशप्रेम आणि वेळेची तप्तरता. याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं जाणवलं हे की हा देश अत्यंत सुरक्षित हातांमध्ये आहे. काश्मीर म्हटल, की आपल्या समोर येणारा प्रदेश आणि त्या ठिकाणचं वास्तव वेगळचं आहे, हे पण जाणवलं.
श्रीनगर विमानतळावर उतरल्यापासून या सगळ्याचा शोध घेण्याच्या प्रयत्न केला आणि काही धक्कादायक निष्कर्ष हाती लागले, अर्थात ते माझे स्वतचे असावेत. पण माझ्यासाठी ते महत्त्वाचे आहेत असं वाटलं, अर्थात याची दुसरी बाजू असेल आणि चार दिवसांत सगळ्याच आर्मीचा, काश्मीरचा, माणसांचा तळ लागेल असंही न्ककीच नाही, पण माझा निष्कर्ष बरोबर आणि चुकांसह मी नोंदवू शकतो, हे निश्चित. किमान लोकशाहीनं एवढं तरी स्वातंत्र्य माझ्या पदरी दिलय, हे महत्त्वाचं.
सैन्याच्या कामात जाणवलेली शिस्त आणि वेळेची तप्तरता हे सगळ्यात महत्त्वाचं. एखादं काम एखाद्या माणसाला दिल्यानंतर त्यानं नाही म्हणायचं नाही, असा आर्मीचा नियम आहे. जी साब, येस साब अशीच काम होतात. कुठलाही एखादा वरिष्ठ अधिकारी दिसला तर जयहिंद साब करायचं असा जणू अलिखित नियमच आहे. जवानांचं डोकं रिकामं राहू नये, यासाठी हा नियम. तसचं एका मेजर सुभेदारनं सांगितलं ते लईच भारी वाटलं, तो म्हणाला एखाद्या देवळासमोरुन जाता, तेव्हा तुमचे हात नकळत वर उचलले जातातच ना, मग आर्मीत त्या जयहिंद साबला हेच महत्त्व आहे.
बदामबाग कॅम्पमध्ये बागकाम करणारे सैनिक जेव्हा, कर्नलची काळी गाडी पाहून काही सेंकदात पोझिशन्स घेवून जयहिंद साब करतात, हे पाहून मन भारावून गेलं, तर कर्नल साहेबांना भेटायची वेळ चुकली म्हणून स्वतची गाडी घेवून आम्हाला घेवून जाण्यासाठी येणा-या लेफ्टनंट कर्नल साहेबांचा राग आम्हाला खूप काही शिकवून गेला. आम्ही सिव्हिलियन्स ना आमच्या जगण्यात शिस्त पाळत, ना आमच्या कामाप्रती आमच्या मनात तितकाच आत्मभाव आहे, असं सतत जाणवत राहिलं.  
दुसरी गोष्ट जाणवली ती की हा देश अत्यंत सुरक्षित हातात आहे. आम्ही चार दिवस केलेल्या प्रवासात ज्या-ज्या वरिष्ठ मंडळींना भेटलो त्यांची पर्सनलिटी बघून पुरुष असून मला खूप हेवा वाटला. आपल्याकडे आणि काश्मीर पोलिसांच्या तुलनेतही आर्मीच्या अधिका-यांचं व्यक्तिमत्त्व आपल्या सगळ्यांना गारुड घालणारं आहे. आम्ही तीन ते चार कॅम्पमध्ये फिरलो, तिथल्या कर्नल, सेकंड कमांडर, लेफ्टनंट कर्नल, मेजर, सुभेदार मेजर अशा पदाधिका-यांशी आम्ही भेटलो, त्यांना बोलतं केलं. त्या सगळ्यांना बघून हा देश अत्यंत सुरक्षित हातात आहे, याची भावना सतत मनात जागृत राहिली.
मग ही माणसं राजस्थानची असो वा गुजरात, महाराष्ट्र वा पंजाबची असो. सगळ्यात लक्षात राहिला, तो उरीच्या सहा हजार फूट उंचीवर असलेल्या कॅम्पवरचा मित नावाचा मेजर. अवघा 20-21 वयाचा हा तरुण मिशरुडीही न फुटलेला. त्याच्या आई-बाबांनी त्याला इथे का पाठवला, असा प्रश्न आपल्याला पडावा अशी स्थिती, तर ऊरीच्या 4 जेकेएलआयच्या कर्नल भवरसिंहांना पाहून ऊर अभिमानानं भरुन यावा अशीच स्थिती.. अवध्या 35-36चा वाटणारा हा अधिकारी त्या सगळ्या प्रदेशाचा राजा आहे. तिथल्या कत्येक सैनिकांचं मनोबल वाढवण्यात याचा वाटा महत्त्वाचा. आम्ही गेलो तेव्हा भारतीय सैन्याचा एक जावन चककीत शहीद झालेला. तरीही अत्यंत प्रेमानं त्यानं त्यानं आमचं आगत स्वागत केलं. या साहेबानं आम्हाला नंतर एका 5 हजार फूट उंचीच्या पोस्टवर नेलं, तिथं जवान कसं राहतात हे सांगताना या राजाच्या डोळ्यात पाणी आलं. एके 47 हाती देत, त्यानं ही बंदूक कधी हाती घेतली होती का असा सवाल केला, आणि त्या बंदुकीचं वजन किती हे  पण दाखवलं, हेल्मेट, संरक्षणासाठी पोटावर आणि पाठीवर पत्रे वागवणा-या सैनिकांच्या एकूण वजनाचा हिशोब करत, या पोस्टवर राहणं किती कठीण आहे, हे पण या क्रनल साहेबानं आम्हाला दाखवलं. आपला एक सैनिक मारला गेला, तर पाकचे चार तरी सैनिक मारुच, आणि सगळ्याच गोष्टी माध्यमांना द्यायच्या नसतात, हेही त्यांनी सांगितलं. आम्ही गेलो तेव्हा खरतरं 25-26 तापमान, पण हा काश्मीरसाठी  खरं तर उन्हाळाच... पुढचे आठ महिने बर्फवृष्टीत र्त्यांना 11 हजार फूट उंचीवर सैन्य तळावर काढावे लागतात. तेव्हा त्यांना या उन्हाळ्यापसूनच मिठापासून सगळ्या धान्याची साठवण करुन ठेवावी लागते. आणि या आठ महिन्याच्या काळात जेव्हा श्रीनगरपासून काश्मीरच्या काही शहरांचाच संपर्क तुटतो, अशा काळात एवढ्या वरच्या पोस्टवर काय स्थिती असेल, याचा विचारच केलेला बरा.. अशा स्थितीत कोणी आजारी पडलं, तर अशा सैनिकांला घेवून येण्यासाठी हेलिकॉप्टर हा एकमेव ऑप्शन असतो. अशा स्थितीत चौकीवर असणा-या प्रत्येकालाच जेवण येणं गरजेचं असतं. अशा स्थितीत ही मंडळी कशी काम करतात, हे मनात आलं तरी अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. हे सगळं सांगताना भारावणारे कर्नल भवरसिंह पाहून मन उंचबळून येतं. त्यांच्या कॅम्पवर असलेला शिवालीक नावाच साडे सहा फूट उंचीचा मेजर असो वा सुरेशकुमार नावाचे वयाने थोडे जास्त असणारे पण पूर्वाश्रमीचे रसायनशास्त्राचे प्राध्यापक असोत, त्यांची जगण्याकडे बघण्याची दृष्टी पाहून, त्यांच्या चेह-यावरचा आनंद पाहून समाधानच वाटतं. बदामबागमध्ये भेटलेले मीडिया सेलचे कर्नल सुरेशकुमार हे तर सव्वा सहा फूट उंचीचे आणि गोरेपान.. या माणसानं आमच्यावर गारुड केलं नसतं तरच नवल.. त्यानं आम्हाला काश्मीरच्या प्रति काम करत असलेल्या सैनिकांच्या कामाची जाणीव तर आम्हाला करुन दिलीच, पण इतर प्रदेशातल्या सिव्हिलियन्सनी या सगळ्या काश्मीरकडे कसं पहावं याची दृष्टीही दिली.. तिथे भेटलेला प्रत्येक अधिकारी असा रुबाबदार होता. टीए 160 कॅम्पमध्ये भेटलेला संदीप राणा तर एकदम फिट, त्याला त्याच्या फिटनेसचं राज विचारलं, तर त्याच्या अधिका-याचं उत्तर होतं, साब दिन में चार घंटे फूटब़ल, ह़ॉलिब़ल खेलते है, और दो घंटा जीम करते है, त्यानं बिचा-यानं नम्रतापूर्वक सांगितलं की फिटनेस हेच तर आर्मीत महत्त्वाचं आहे. अमन कमान ब्रिजच्या पॉईंटवर भेटलेला मेजर विनय यापैकीच एक.. अमन कमान ब्रिज या भारत-पाकच्या अगदी एलओसीच्या बॉर्डवर तैनात असलेला हा मेजर आपल्या अनेकांसाठी प्रेरणादायी असाच.. तिथे आम्ही त्याच्यासोबत एका वरपर्यंतच्या पोस्टचाही प्रवास केला. त्याठिकाणी सैनिक खरचं कसे राहतात, आणि त्या ठिकाणी पोहचण्यासाठी त्यांना लागणारे कष्ट आम्हाला प्रत्यक्षात अनुभवता आले. प्रत्येक्षक क्षणाला पाकच्या बंदुकीच्या टोकावर जगताना या सैनिकांच्या मनात किती देशप्रेम असेल, हे जाणवलं.. आणि स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनीही झेंडावदनाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवणा-या आम्हा सर्व देशवासियांची मनापासून लाज वाटली.   
कित्येक मराठी माणसं त्या परिसरात जवान ते अत्यंत उच्चपदावर काम करताना आम्हाला दिसली. पण प्रत्येकाच्या मनात असलेला देशप्रेमाचा ओघवता प्रवाह पाहून थक्क व्हायला झालं. मराठीतले गडी भेटूनही संवाद झाले ते हिंदीतच. कारण ही राष्ट्रभाषा आहे, आणि त्यांची जीवनदृष्टीच त्या भारतीयत्वाच्या नावान मोहमय झालेली आहे. सैन्याच्या वरिष्ठ मेजर सुभेदार पदावर कार्यरत असलेले कल्याणचे मानवजित ठाकूर यांचं काश्मीर खोरं आणि इतिहासाचं ज्ञान पाहून आम्ही सगळेच चांगलेच प्रभावित झालो, म्हणजे ही मंडळी केवळ तिथे नेमणूक आहेत म्हणून नाहीत, तर त्यांना त्या प्रदेशाबाबत आदर आहे, आणि तो प्रदेश आपला असल्याची आत्यंतिक भावनाही..  
झेलमचं पात्र पाहून भारत आणि पाकला दुंभगून ही जीवनवाहिनी इतकी शांतपणे कशी वाहू शकते, याचं नवल वाटतं. तिचं डोंगर, द-यातलं सौंदर्य क्षणाक्षणाला मोहवून टाकतं, आणि एका अनुरुप सुखाचा अनुभव देवून जातं. ते मोबाईलच्या फोटोत कैद करुन अनेकदा उपयोगच नसतो, कारण तिचा खळखळणारा आवाज त्या फोटोत कधीच कैद होवू शकत नाही.         
आम्ही चार दिवस तिथं होतो, पण आमचा क्षण न क्षण कसा योग्य जाईल याची योग्य तरतूदच सैन्यातर्फे करण्यात आली होती. आमच्यासोबत असलेले सैन्यदलाचे जवान मुख्यारभाई यांचा फॉलोअप प्रत्येक ठिकाणी घेतला जात होता, आणि प्रत्येक कॅम्पवर पोहचण्याआधी तिथले वरिष्ठ अधिकारी आमच्याशी स्वत बोलत होते, प्रत्यक्ष भेटीपूर्वी एका ठिकाणच्या वरिष्ठ अधिका-यानं तर आम्ही पोहोचेपर्यंत 20-30 फोन केल्याचंही आम्ही पाहिलं. आपल्या वरिष्ठांनी दिलेली ऑर्डर पाळण्यासाठी त्या सैनिकांचा, अधिका-यांचा अट्टाहास पाहून मन गलबलायला झालं. कित्येक ठिकाणी तर सुरक्षेची कारणं असली तरी नम्रपणाने नकार देत, जे जे देशापुढे जायला हवं, त्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार थक्क करणारा होता. कुठल्याही एखाद्याही प्रसंगात सैन्यदलाचं चुकीचं चित्र देशातील नागरिकांसमोर उभे राहू नये, यासाठी ते अतिशय काटोकेर होते.
आणखीन एक बाब म्हणजे, सैन्यात मिळणा-या अन्नाविषयी.. सगळ्या प्रदेशातील, आणि अनेक पथ्यांचे लोक असल्यामुळे तिथं अत्यंत साध पण पोटभर जेवण बनविण्यात येत. तिखट, मसालेदार असे पदार्थ फारसे नसले, तरी प्रत्येकाला पोटभर मिळेल, याची योग्य व्यवस्था करण्यात आलेली असते. अगदीच ऑपिसर्सच्या पंगतीला स्वीट डिशचा एखादा अपवाद वगळला तर प्रत्येकाच्या पदरात योग्य पौष्टिक, साधं आणि पोटभर जेवण पडेल, याची पुरेपूर व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. यामुळेच या मंडळींचा फिटनेस वाखाणण्याजोगा असावा.     

प्रत्येक कॅम्पवर आमचं झालेलं स्वागत, आमचं आदरातिथ्य हे डोळ्यातून पाणी काढणारं होतं. सगळ्यात जाणवला तो जवानांचा प्रामाणिकपणा.. आपल्या भ्रष्ट कारभार असणा-या देशात अगदी आपल्या रुमबाहेर दिवसरात्र आपली देखभाल करणारा सैनिकही टीप वगैरे घेत नाही, हे पाहून आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहिला नाही.
जम्मू काश्मीरमध्ये घरदार सोडून राहिलेल्या या जवानांना सातत्यानं आगीशी खेळ करावा लागतो. शत्रू कोण हे माहित नसतानाही, त्या त्या गावात पाच सहा तास खडा पहारा द्यावा लागतो.. आणि खरं सांगतो, त्या परिसरात आर्मीचे हे कॅम्प, सैनिक, सातत्यानं होणारी आर्मीच्या गाड्यांची ये-जा आहे, म्हणूनच काश्मीर आपल्याकडे सुरक्षित आहे, असं आम्हाला वाटलं.
आर आर रायफल्स 52च्या कॅम्पवर गेलो असताना. हे सैनिक किती कडवी झुंज देतायेत हे अनुभवलं. कार्यक्रम सुरु असताना एक तुकडी एका ऑपरेशनसाठी बाहेर पडली, ती ही अवघ्या 5 मिनिटांत. त्यांची शस्त्र, त्यांची पळापळ.. त्यांची शेवटची निकराची प्रार्थना आणि हे सगळं करतानाचा त्यांचा आवेश पाहून.. त्यांचं मनोधैर्य किती मोठ्या उंचीचं असेल, हे अनुभवता आलं. काश्मीरच्या सुमारे प्रत्येक गावागावात, रस्ताय रस्त्यांवर या आर.आर. रायफल्सच्या सैनिकांची उभी गस्त कशी असते, आणि त्यांचं एकूणच वेळापत्रक कसं आहे, हे पहायला मिळालं.
प्रश्न उरतो तो काश्मीर खो-यांत कसं वातावरण आहे हा.. अगदी खरं सांगयचं तर श्रीनगरपासून आम्ही ज्या ज्या भागात फिरलो, तो तो भाग आपल्या मुंबई, पुणे, नाशिक अगदी जिल्हा ठिकाणांपेक्षाही अगदी कमी विकसीत वाटला. कित्येक ठिकाणी साधी घरे, दुकाने असं आपल्याकडे 20-25 वर्षांपूर्वी असलेलं वातावरण आम्हाला अनुभवायला मिळालं.. काश्मीरातला गरीब असो वा, मुंबईतला यांच्या दोघांच्या परिस्थितीत फार काही फरक आहे, असं काही जाणवलं नाही. दुसरी बाब जामवली ती म्हणजे शिक्षणांचं वाढतं प्रमाण. प्रत्येक गावात असलेल्या शाळा, स्कूलबसच्या फे-या यातून काश्मीरच्या विद्यार्थ्यांचं शिक्षणाप्रती प्रेम पाहून बरं वाटलं.
काश्मीरपेक्षाही जम्मू भाग हा अधिक पुढारलेला आहे, असं आमचा ड्रायव्हर शब्बीरभाईच्या बोलण्यातलं आलं. हा मुळचा श्रीनगरचा.. मात्र साततत्यानं या सर्व भागात त्याचा प्रवास असल्यानं, त्यानं सांगितलेली काही निरिक्षण महत्त्वाची वाटली. काश्मीर भागात सृष्टीसौंदर्य आहे, पर्यटन हा या भागातील महत्त्वाचा व्यवसाय. मात्र गेल्या वर्षी आलेल्या पुरानंतर या व्यवसायाची पाठ कोलमडली आहे. या पुरामुळं काश्मीर खोरं अधिक मागे गेलं असं त्याच्या बोलण्यातनं कळलं. काश्मीरमध्ये सध्या पीडीपी आणि भाजपचं सरकार असलं तरी हुरियत कॉन्फरन्सचे नेतेच अधिक सरकार चालवत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याच्या एकूण बोलण्यातून काश्मिरी जनता या सगळ्या भांडणाला कंटाळली आहे, आणि एकदा काही तरी एक कायमस्वरुपी तोडगा निघावा अशी त्यांची इच्छा असल्याचं जाणवलं. पाकबाबात आकर्षण असलं तरी त्यांना भारतात राहण्याचा सार्थ अभिमानही जाणवला. भारत हा पाकच्या कितीतरी पट पुढे आहे, मात्र एवढं करुनही काशमीर खो-याचं स्वतंत्र अस्तित्व असावा, असाही एक मतप्रवाह असल्याचं त्याच्या बोलण्यातनं जाणवलं.
सैन्य त्या भागात कशा परिस्थितीत काम करत आहे, हे पदोपदी जाणवलंच. मात्र हे दृढ झालं ते बदामबागमधील आर्मीचं संग्रहालय पाहून.. 1947 पासून ते आतात्पार्यंतच्या सैन्यदलानं केलेल्या लढाया, त्यातही शत्रूपक्षाकडून जिंकलेली शस्त्र या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. एके 47 आणि एके 56 रायफल्सच्या विभागात तब्बल 30 हजार शस्त्र दहशतवादी कारवायांतून जप्त करण्यात आली आहेत. त्यानंतर संग्रहालयात जागा नसल्यानं 2010 नंतर ही शस्त्रचं स्वीकारण्यात आलेली नाहीत. त्यात पिसतूल, रॉकेट लाँचरपासून अनेक शस्त्रांचा समावेश आहे. हे सगळं मिळालेल्या शस्त्रांच्या केवळ हिमनगाचं टोक असल्याचं सांगितल्यानंतर पाककडून होणा-या कुरघोड्यांचं गणितचं आमच्या लक्षात आलं. 11-साडे 11 हजार फूट उंचीवर लढणा-या सैनिकांच्या, वरिष्ठांच्या कहाण्या ऐकून अंगावर रोमांच उभे राहिले.
त्याचसोबत आर्मीकडून खो-यात करण्यात येणा-या चांगल्या उपक्रामांबाबतही यातून माहिती मिळाली. त्यात महिला सबलीकरण केंद्र, सैन्यांतर्फे सुरु करण्यात आलेल्या शाळा, पुलांची आणि रस्त्यांची उभारणी, पूरस्थितीत सैन्यानं केलेलं मदतकार्य या सगळ्यांचा समावेश होता. याहीपेक्षा श्रीनगरमध्ये ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या मुलांसाठी सैन्यानं शाळा सुरु केल्याचं सांगितल्यानंतर मन भारावून गेलं. आणि सैन्याप्रतीचा आदर द्विगुणित झाला.
काश्मीरच्या खो-यात आपलं घरदार सोडून राहणा-या या सैनिकांप्रती स्थानिक नागरिकांच्या मनात प्रेम उत्पन्न व्हावं, ही सैन्याची धारणा आहे. याच हेतूने काश्मीर खो-यांतील काही गावांमधून स्थानिक जवान सैन्यात भरती करण्यासाठी सैन्यदलाचे प्रयत्न सुरु आहेत. घरदार सोडून येणा-या सैनिक वा अधिका-याला पाहून जेव्हा एखाद्या गावातील एखादा लहानगा दहशतीने पळून जातो, तेव्हा या सैनिकांच्या मनाला किती वेदना होत असतील, असा सवाल मला त्या ठिकाणी एका अधिका-यानं विचारला. खरंतर सैन्याचं काम हे भूभाग संरक्षणाचं पण काश्मीर खो-यातल्या मंडळींबाबत एक आपुलकीची भावना निर्माण करण्याचं मोठं आव्हान सैन्यासमोर आहे, आणि ते पेलण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. काश्मिरींसाठी भारतीय सैन्य अशा एका भव्य विचारांवर राष्ट्रीय एकात्मता वाढवण्याचा सैन्याचा प्रयत्न आहे. यासाठी गरज आहे ती आपआपल्या प्रदेशातूनही काश्मिरी जनतेला, काश्मिरी युवकांना हा देश आपला आहे, हे जाणवून देण्याची. यासाठी आवश्यक असलेल्या एकात्मततेच्या बाबींमध्ये आपणही सर्वांनी पुढाकार घ्यावा, याची खरी गरज आहे.
काश्मिरमध्ये असलेल्या अनेक कायद्यांमुळे त्या प्रदेशाच्या विकासाला मर्याला आहेत, हे नक्कीच. मात्र जोपर्यंत त्यांच्या शिक्षणाचा, रोजगाराचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत दहशतवादी हल्ल्याचं हे आव्हान सैन्यापुढे कायम असणारं असं जाणवलं. हे थांबवण्यासाठी आपल्या सगळ्यांकडूनच, सरकार आणि प्रशासनाव्यतिरिक्तही अधिक प्रयत्न होण्याची गरज आहे.
आम्ही श्रीनगरहून परतत असताना, आमच्या विमानात एक फौजी होते, ते साडे अकरा हजार फूट उंचीवर कार्यरत होते, ते मुळचे बेळगावचे. त्यांच्या वडिलांना त्रास सुरु झाल्याचं कळताच ते पोस्ट सोडून निघाले पण त्यांना त्यांच्या कॅम्पवर पोहचालया तब्बल दोन दिवस लागले. दोन दिवसांनंतर त्यांना विमानतळावर यायला सहा तासांचा प्रवास करायला लागला. या सगळ्या प्रवासात त्यांच्या वडिलांचं निधन झाल्याची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली. आमच्या विमानानं ते मुंबईला उतरले आणि त्यापुढे गाडी करुन ते बेळगावला पोहचणार होते.
या अशा परिस्थितींवर मात करत, आपल्या देशासाठी जीवाची बाजी लावणा-या या सैन्यदलाबाबत एकच भावना येते. ती म्हणजे जयहिंद साब...एवढं तरी आम्ही आमच्या दैनंदिन आयुष्यात आचरणात आणलं, तरी खूप आहे. आर आर रायफल्सच्या सेकंड कमांडरच्या भाषेत सांगायचं झालं तर सैन्याबाबत देशात अनेकांच्या मनात अनेक चुकीचे समज आहेत, त्यानं म्हटलं. आर्मी म्हणजे शिस्त.. आणि जीवन जगण्याची ही एक सुंदर पद्धतच आहे..
रारंगढांग वाटताना आपणही कधीतरी असं काही तरी पहावं, जगावं, अशी इच्छा मनात आली होती, या चार दिवसांच्या निमित्तानं का हीना, पण ही इच्छा पूर्ण झाली.. आपण कधी आर्मीत का गेलो नाही, असा प्रश्नही मनाला पडला. त्याची रुखरुखही वाटली.. भविष्यात आपल्या मुलाबाळांच्या पातळीवर तरी आपण हा आग्रह धरुयात.. ही भावनाही मनात आली..
जयहिंद