Friday, February 19, 2010

फूलचंद रिमझीम...


कलकत्ता पान.. नेहमीप्रमाणे चुना, कात...त्याच्यावर नवतरन किमाम... मिनाक्षी चटणी (ही चटणी सुंगधी असते बरं का..) त्याच्यानंतर थोडी काळी सल्ली.. आणि त्यावर टाकलेला रिमझिमचा थर... आणि मग हे सगळं एकत्र घोळून तयार केलेल्या पानाला थोडावेळ पानपट्टीच्या काठावर दिलेला आराम.. थोड्या वेळाने हे मिश्रण थोडसं काळं झालं की त्याच्यावर हलकेच टाकलेली गरजेप्रमाणे ( माझ्यासाठी थोडी पक्की बारीक) सुपारी.. मग त्यात टाकलेली इलायची किंवा लवंग आणि मग पान लपेटून पान आपल्याकडे आलं की तोंडात टाकल्यानंतर पानाचा जाणवणारा सुंगध.. आणि चौथ्या मिनिटाला पानाची येणारी किक... हे सगळं गणीत आहे फूलचंद रिमझीम या पानाचं...
पु. लंनी पानवाला लिहल्यानंतर, आता खरतरं काही वेगळं लिहायला शिल्लक नसलं तरी फूलचंद रिमझीम हे एक असं पानामधलं जबरदस्त आकर्षण आहे की मी त्याच्याबाबत लिहण्यापासून स्वतला रोखूच शकतं नाही.. बरं हे पान आहे कुठलं हे तरी विचारा... हे पान पुण्यनगरीच्या पंचक्रोशी परिसरात प्रचंड फेमस आहे... पुण्याच्या कोणत्याही चांगल्या पानपट्टीवर गेलात तर तर पानवाल्याकडे एकाच प्रकारची प्रचंड पानं तो लावत असताना हमखास दिसणारचं... आणि तुम्ही त्याला फूलचंद मागून पहाच की तो त्या-त्या पानवाल्याच्या कुवतीप्रमाणे कुठे फ्रिजमधून तर कुठे थंड बर्फाच्या डब्यातून हे पान तुमच्या हातावर ठेवणार नाही तर नाव बदलायला आपण तयार...
मी गेल्या चार पाच किंवा त्याच्याही आधीपासून या पानाचा चाहता आहे.. पहिल्यांदा मला आठवत नाही पण कधीतरी पुण्यात भावाकडे गेलो असताना त्याच्या तोंडून मी या पानाचं वर्णन ऐकलं आणि ट्रायही केलं.. त्यावेळी सवय नसल्यानं पान खाल्ल्यावर थोडं गरगरलंही.. पण मग हळूहळू पान खाण्यात मुरत गेल्यानं या फूलचंदनी मला जबरदस्त वेड लावलं..(जरा अतिशयोक्ती वाटेल खरी पण आहे बाबा..) .. म्हणजे चार पाच वर्षांपूर्वी आम्ही केलेल्या चांदा ते बांदा कार्यक्रमात तर प्रत्येक ठिकाणी त्या-त्या प्रकारची पानं खाण्याची आम्ही एकमेकांत जणू काही स्पर्धाच केली होती म्हणा ना..

यातूनच हे पान खाण्याची सवय जडली.. आमच्या काही मित्र मंडळींनाही हळूहळू या पानाचा नाद लागलाच.. आमचे एक बंधुराज म्हणतात की एका हाफ क्वार्टरची किक एका पानात आहे ते म्हणजे फूलचंद... आता बोला.. मुंबईकरांना खरतरं या पानाच्या गोडीचं मह्त्व कळणार नाही.. मुंबईत किंवा इतरत्र तंबाखूचं पान म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते 120 किंवा 120-300 मात्र.. या पानांच्या कडवट चवीपेक्षाही मसाला पानाच्या चवीवर जाणारं आणि मसाला पान नसणारं पान म्हणजे फूलचंद रिमझीम..


पान खाणं हे व्यसन आहे असं मी म्हणणार नाही, मात्र पान खाणं हा शौक आहे, असं मी मानतो... आणि आपल्या जगण्यात असे काही थोडके आणि कमी अपायकारक शौक ठेवायला हरकत नाही, असंही म्हणायला हरकत नाही.. पुलंनी जेवढ्या ठामपणे पानवाल्यात लिहलयं त्याप्रमाणे या सर्व प्रकाराचं समर्थन करता येणार नाही, मात्र मसाला पान तयार करायला खरं तर पानवाल्यालाही आवडत नाही..विचारा हवं तरं.. कारण या पानासाठी त्याला लागणारी मेहनत ही जास्त असते आणि या पानांची गि-हाईकही आठवड्याकाठी (सुट्टीच्या दिवशी) किंवा महिन्याकाठी (पगारांवर) अवलंबून असतात. त्यामुळेच नेहमीच्या पानपट्टीच्या गादीसमोर उभं राहिल्याबरोबर पानवाल्याने आपलं पान न विचारता लावणं यात खरी रंगत आहे.. अगदी सुपारी कोणती याच्यासकट...


तसं गेल्या काही वर्षांपासून पानं खाण हे खरतरं कमीपणाचं मानलं जाऊ लागलय.. सिगरेट चालते मात्र अगदी सणासुदीच्या जेवणानंतरच पान खावं असा एक पायंडा पडलाय.. त्यामुळे डाऊन मार्केट झालेल्या पानाला आता केवळ मुंबईत तरी भय्येच वाली असल्याचं दिसतं... पण पान खाणं हा शौक आहे, असं मानून पान खाणा-या पुणेकरांचं मला नेहमीच कौतुक वाटतं.. एखाद्या ढाब्यावर किंवा हॉटेलात जेवण झाल्यावर जेवणाचा स्वाद फुलचंदसह रिचवित पिचका-या मारणा-यांचा आनंद शब्दात काय वर्णन करायचा... मुंबईत दररोज आपल्या कामात गढलेल्या आणि ऑफिस पॉलिटिक्स किंवा स्पर्धेच्या मा-यात असणा-यांना या आनंदाची कल्पना काय येणार.. तसं सगळ्याच पुणेकरांनाही याचा आनंद घेता येत असेल असंही नाही म्हणा..मात्र यासाठी ना माणसाला मुंबईकर असावं लागत ना पुणेकर.. तर माणसाचं आवर्जून पानावर त्याहीपैक्षा शौक करण्यावर प्रेम असायला हवं.. तरच याची गम्मत तुम्हा आम्हाला समजू शकेल..


Thursday, February 18, 2010

मजा जामनगर प्रवासाची..

ऑफिसच्या धबगड्यातनं सुट्टी काढून कुठेतरी जावं, असं खूप दिवसांपासून मनात होतं.. त्यात बायको आणि माझ्या सुट्टीच्या वेळा एकत्र येत नसल्यानं कुठेतरी दूर जाणं अशक्यप्राय होऊन बसलं होतं... अखेर वैतागून 10 डिसेंबरला ठरवलं.. आणि 12 डिसेंबर ते 17 डिसेंबर अशी सात दिवसांची सुट्टीची परवानगी मिळवली आणि जामनगरला जायचं नक्की केलं...

एकतर सर्वात मुख्य हेतू म्हणजे तिथे असलेल्या माझ्या भाच्याला भेटणं... तन्मय त्याचं नाव.. अडिच वर्षाच्या या पोराचं बाळंतपण आमच्या बदलापूरच्या घरात झालंय.. त्यामुळे त्याचा आमच्या घरात सगळ्यांना विलक्षण लळा आहे... त्याला सुरुवातीचे तीन महिने आम्ही अक्षरश: हातावर वाढवलय. ( कारण तो झोपत नसे आणि रात्री घरी गेलो की दिवसभर कंटाळेल्या आई आणि भगिनींची सुटका करण्यासाठी त्याला कुशीत घेऊन, फे-या मारुन झोपवणे ही माझी जबाबदारी असे..) त्या सगळ्या काळात आम्ही म्हणजे सगळ्यांनीच खूप छान आनंद लुटलाय. त्यात आपल्या धाकट्या बहिणीचा मुलगा हे तर अगदीच अप्रूप त्यामुळे त्याला भेटण्यासाठी माझा जीव अगदी अधीर झाला होता. त्यातच तो आता छानसा बोलूही लागलाय.. वर्षभरातून त्याची भेट तशी दोन-तिनदा होते, पण प्रत्येक वेळेला त्याच्या भेटीची ओढही भन्नाट असते... ती शब्दात व्यक्त करणं तसं अशक्यप्राय आहे... आणि धाकट्या बहिणीला तिच्या संसारात यजमानांसह रमताना बघण्याचा अनुभवही छानचं...

दुसरं एक कारण म्हणजे अपर्णा माझी बहिण ज्या ठिकाणी रहाते, ते आहे रिलायन्सची जामनगरची टाऊनशिप.. तिथे शांतता म्हणजे खरोखरच निवांतपणा असतो... गेल्यावेळी मी गेलो तेव्हा हा तिथला प्लस पॉईंट माझ्या लक्षात आला होता... त्यामुळे निव्वळ आराम करता यावा आणि जिथे आमचं चॅनेल अजिबात दिसणार नाही, याची काळजी घेता येऊल असं ठिकाण म्हणून मी जामनगर ही निवड केली..

जामगरला जाताना नेहमीप्रमाणे चेतन भगतचं नवीन पुस्तक टू स्टेटस माझ्या बरोबर होतच.. गेल्या वेळी जामनगर दौ-यात मी चेतन भगतचंच थ्री मिस्टेक्स इन माय लाईफ हे पूर्ण केलेलं... त्यामुळे दरवर्षी चेतन भगतनं माझ्या जामनगर दौ-यासाठी एक पुस्त लिहावं असं मला आवर्जून वाटतं..

तिसरं एक महत्वाचं कारण म्हणजे गुजरातला गेल्यावर मोठ्ठा प्रवास करायला मिळेल याबाबत मी निश्चिंत होतो... कारण मी गेलो म्हणजे हेमंत ( अपर्णाचे अहो), अपर्णा, तन्मय आणि मी कुठेतरी भटकायला जाणारच.. दुसरं म्हणजे त्यांनी नुकतीच नवी कार घेतल्याने तिच्यातूनही फिरुन होईल, अशा सर्व विषयांचा विचार करुन योग्य ठिकाणाची निवड केल्याचं समाधान होतं.. मी निघाल्यापासून छानच थंडी होती आणि सात दिवसांचा आराम ही कुणालाही रोज लोकलने ऑफीसला जाणा-या-येणा-नांच समजेल अशा सुखात मी प्रवास पूर्ण केला..

मी गेल्यावर लगेचच दुस-या दिवशी आमचा बाहेर जेवायला जाण्याचा बेत नक्की झाला.. आणि जवळ असलेल्या खंबालिया गावात एक मिलन नावाचा कुठलातरी ढाबा आहे आणि तिथे जेवायला जायचंय एवढचं ठरलं... त्या छाब्याबाबत त्या परिसरात मोठी मान्यता असल्यानं, दुपारचं जेवण जरा स्किपच केलं... आम्ही संध्याकाळी सात-आठच्या सुमारास जामनगरहून तर निघालो.. खंबालिया जामनगरहून अर्ध्या तासावर आहे... आम्ही छानपैकी एका समुद्रकिना-याच्या अयशस्वी शोधानंतर अखेर आमची गाडी या मिलनच्या शोधात वळवली.. विशेष म्हणजे गेल्या तीन एक वर्षांपासून तिथे राहत असूनही आमचे जावईबापू आणि भगिनी तिकडे फिरकल्या नव्हत्या... मग खंबालियात गेल्यावर टिपिकल ढाब्याचा शोध घेत असतानाच, एका कोप-यावर तो मिलन ढाबा असेल असं कोणीतरी सांगीतलं.. गेल्यावर ते एक टिपिकल हॉटेल निघालं.. पूर्वी कधीतरी याचा ढाबा असवा असा माझा समज झाला.. म्हणजे तो आम्ही तिथे करुन घेतला... खरतरं तिथला एकूण लूक बघून मनातून छोडासा निराशच झालो होतो... मात्र अखेर आम्ही जेवणाच्या टेबलवर बसलो.. आणि आम्ही खरोखरच स्वर्गसुखाचा आनंद घेतला.. गेल्यानरच टेबलावर ठेवण्यात आलेली काकडी-दह्याची कोशिंबिर, लोणची, गोड-तिखट गुजराथी चटण्या आणि मिरच्या यांनी आमचं टेबलावर स्वागत केलं.. प्रत्येक टेबलावर हे पदार्थ असेच कॉम्प्लिमेंटरी ठेवण्यात आले होते.. त्यानंतर आम्ही ऑर्डर दिली..त्यात या काठेवाडी भागातील खास प्रकार उंदिया ( ही भाजी काही डाळींपासून बनवतात आणि खास करुन संक्रांतीच्या काळात या भाजीला या परिसरात विशेष महत्व आहे.) वांग्यांची भाजी, ताक ( याबबद्दल नंतर लिहिनच..) , शेव-टॅमेटो ( हाही या भागात मिळणारा अफलातून प्रकार आहे. ) हे सर्व पदार्थ एकत्रित आले.. उंदिया आणि वांग्याची भाजी यांना तेल आणि तिखटाची चव असूनही त्यात एक गोडवा होता. विशेष म्हणजे इथे पोळ्या आणि ढेपले असे दोन ऑप्शन्स खाण्यासाठी होते. हॉटेलात एका बाजूला सात ते आठ बायका स्टोव्ह घेऊन बसल्या होत्या. त्यांच्या कृपेने गरमागरम पोळ्या किंवा ढेपले आमच्या ताटात पडत होते.. त्यामुळे डिसेंबरच्या थंडीत अशा गरमागरम खाण्याची लज्जत काय असते... हे खवय्यांना सांगायला नकोच... त्यात विशेष कळस केला तो इथल्या ताकाने..घट्ट , पांढरेभुभ्र आणि थंडगार ताक असल्यामुळे, पाण्याऐवजी आम्ही सगळ्यांनीच ताक पिणेच पसंत केले... आता सांगायला हरकत नाही, पण मी किमान या जेवणात आठ ते दहा ग्लास ताक प्यायलो... असा छान जेवण्याचा आनंद गुजरातमध्ये वाळवंटी प्रदेशात एखाद्या शहरात मिळावा..हे म्हणजे सुट्टीच्या दुधात साखर मिळाल्यासारखं झालं... तर असा हा छान स्वर्गीय भोजनाचा आनंद उपभोगून नंतर आम्ही छानशी जुनी गाणी ऐकत रात्री साडे नऊ दहाच्या सुमारास जामनगरला परतलो..

त्यानंतर दुस-याच दिवशी आम्ही सकाळी द्वारकेला गेलो... द्वारका, बेट द्वारका, नागेश्वर ज्योतिर्लिंग आणि एका छानश्या समुद्रकिना-यावर आमची ही दिवसभराची ट्रीप झाली.. त्यातही सांगायचं म्हणजे ज्या समुद्रकिनारी आम्ही गेलो होतो...तिथल्या एवढा शांतपणा आजतागायत मी कोणत्याही समुद्रकिना-यावर अनुभवला नाही... मात्र सकाळपासून या संपूर्ण प्रवासात आम्हाला कुठेही छानसं असं काही खायला मिळालं नव्हतंच.. त्यामुळे अखेर परतताना दिवसभराच्या उपासानंतर आम्ही सगळेच भुकेलेले होतो... आणि येणारा रस्ता हा खंबालिया मार्गेच असल्यानं त्या दिवशीही भोजनासाठी आम्हाला पुन्हा एकदा मिलनची पर्वणी अनुभवता आली...

या सगळ्या सुट्टीत मी मनापासून एन्जॉय केलं.. दोन-तीन सिनेमे, त्यात पा आणि रॉकेटसिंगचा समावेश.. अपर्णा , हेमंत आणि तन्मयची मस्त कंपनी आणि भरपूर प्रवास यामुळे मुंबईत परतण्यापूर्वी मी ताजातवाना झालो नसतो तरच नवल... ही सुट्टी संपूच नये असं वाटत असतानाच अचानक उद्या निघायचं हे लक्षात आल्यानं मन थोडसं खुट्टु झालं... परताना गेटवर पोहचवायला आलेल्या तन्मयला सोडून येताना दरवेळेप्रमाणे याहीवेळी पाणी तरळलंच.. आणि माझा मुंबईकडचा प्रवास पुन्हा सुरु झाला.. मनातल्या मनात मी अपर्णा, हेमंत आणि तन्मयला थँक्स म्हटलं.. आणि पुन्हा रोजच्या धकाधकीत नव्या उर्जेनं दाखल होण्यासाठी पुन्हा सज्ज झालो...
आता या संपूर्ण सुट्टीला दोन महिने उलटून गेले... आत्ताच हे लिहण्याचा कारण म्हणजे त्या आठवणींचा पुनर्प्रत्यय अनुभवावा हा मुख्य उद्देश.. खरतरं फक्त मिलनबद्दल लिहावं असं डोक्यात होतं.. मात्र त्या हॉटेलातील खाण्याच्या पदार्थांचे फोटो मोबाईलमधून डिलीट झाले.. त्यामुळे या सर्व प्रवासाचाच हा एक वृत्तांत..

Monday, February 15, 2010

मूळ कारण आहे प्रसिद्धी...

घटना पहिली- अवधूत गुप्तेंच्या झेंडा वरुन नवा वाद.. राज , बाळासाहेबांना सिनेमा दाखवा.. प्रसिद्धी... शिवसेना-मनसेचा हिरवा कंदील...पुन्हा प्रसिद्धी.. राणेंच्या स्वाभिमानचा सिनेमाला आक्षेप... प्रसिद्धी.. नितीश राणेंनी चित्रपट पाहिला..मालवणकर व्यक्तीरेखेचे नाव बदलण्याची सूचना..प्रसिद्धी...सिनेमातील पात्रांचे नाव बदलण्याची गुप्तेंची तयारी..प्रसिद्धी.. चित्रपट प्रदर्शित झाला, मनसेकडून ठाण्यात थिएटरमध्ये तोडफोड..पुन्हा प्रसिद्धी..शिक्षणाच्या आईचा घो या नावाला मराठा महासंघाचा वरोध.. प्रसिद्धी... मांजरेकरांचा नाव बदलण्यास नकार..प्रसिद्धी.. मराठा महासंघ आणि मांजरेकरांची चर्चा.. प्रसिद्धी... मांजरेकरांनी महासंघाच्या नेत्यांना चित्रपट दाखवला..प्रसिद्धी... अखेर सुरुवातीला चित्रपटातून माफी मागण्याची मांजरेकरांची तयारी.. नाव बदलण्यास नकार..प्रसिद्धी

घटना दुसरी- मुख्यमंत्र्यांनी मराठी माणसांनाच टॅक्सी चालकाचे परवाने देण्याची घोषणा केली.
पडसाद-शिवसेना- भाजपची गोची, मनसेनं केलं समर्थन, उत्तर भारतात मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका, सगळ्याचं कारण प्रसिद्धी ... दुस-याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भूमिकेपासून केलं घूमजाव.. मराठी भाषा माहित असलेल्या सगळ्यांनाच परवाने मिळतील अशी नवी भूमिका
पडसाद- मनसेकडून झालेल्या मुख्यमंत्र्यांवरच्या सडकून टीकेला प्रसिद्धी, राष्ट्रवादीचीही मराठी भूमिका, पुन्हा प्रसिद्धी

घटना तिसरी - सचिन तेंडुलकरनंतर प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मुंबई सर्व देशाची असं वक्तव्य..
पडसाद घटनेच्या प्रसिद्धीनंतर शिवसेनेची सडकून टीका मुंबई महाराष्ट्राचीच शिवसेनेचा पलटवार.. मुंबई कुणाची हा नवा वाद.. त्यानंतर सरसंघचालक आणि राहुल गांधी यांचीही याविषयावरची मते.. दोघांनीही मांडली मुंबई देशाची असल्याची भूमिका... पुन्हा प्रसिद्धी... संघ -शिवसेना आमनेसामने-- पुन्हा प्रसिद्धी..राहुल गांधींच्या दौ-यात शिवसेनेचा गोंधळाचा प्रयत्न करण्याची शक्यता... पुन्हा प्रसिद्धी... राहुल गांधींच्या दौ-यात काळे झेंडे दाखवा, शिवसेनाप्रमुखांचा आदेश.. पुन्हा प्रसिद्धी.. राहुल गांधी यांच्या दौ-याचं सकाळपासून कव्हरेज..पुन्हा प्रसिद्धी.. शिवसेनेच्या आमदारांना अटक..राहुल गांधींनी मार्ग बदलला.. लोकलमधून केला प्रवास..पुन्हा प्रसिद्धी.. शिवसेनेची गोची झाल्याच्या प्रतिक्रिया..पुन्हा प्रसिद्धी.. मुख्यमंत्री आक्रमक...पुन्हा प्रसिद्धी... रमेश बागवेंनी उचलली राहुल यांची चप्पल..पुन्हा प्रसिद्धी...


घटना चौथी - बाळासाहेबांच्या वाढदिवशी मातोश्रीवर गर्दी..संध्याकाळी मेळाव्यात आयपीएलमध्ये ऑस्ट्रलियन क्रिकेटपटूंना विरोध करणार, शिवसेनेची नवी भूमिका.. पुन्हा प्रसिद्धी... शरद पवार यांची औरंगाबादच्या राष्ट्रवादीच्या शिबिरात शिवसेनेवर टीका..पुन्हा प्रसिद्धी..संध्याकाळी शरद पवारांची बाळासाहेबांची झाली भेट...पुन्हा प्रसिद्धी.. मातोश्रीवर रंगल्या गप्पा.. बाळासाहेब निर्णय घेणार...पुन्हा प्रसिद्धी..राज्यात दोन सत्ता केंद्र नकोत..मुख्यमंत्र्यांची भूमिका.. पुन्हा प्रसिद्धी... शिवसेनाप्रमुखांची पाच-सहा दिवसांनंतर कांगारुंना विरोध कायम असल्याची भूमिका..पुन्हा प्रसिद्धी...


घटना पाचवी.- आयपीएलमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा समावेश नाही...पुन्हा प्रसिद्धी.. पाक खेळाडूंना संधी मिळायला हवी होती.. शाहरुखचे मत.. पुन्हा प्रसिद्धी...
पडसाद- शाहरुखच्या भूमिकेला शिवसेनेचा विरोध... पुन्हा प्रसिद्धी... शाहरुखने माफी मागण्याची मागणी...पुन्हा प्रसिद्धी.. शाहरुखचा माफी मागण्यास नकार..पुन्हा प्रसिद्धी... राहुल गांधी दौ-यानंतर शिवसनेचा विरोध मावळला... पुन्हा प्रसिद्धी.. पवार-बाळासाहेब भेटीनंतर शाहरुखविरोध पुन्हा उग्र... माय नेम इज खान रिलीज होऊ न देण्याचा इशारा..पुन्हा प्रसिद्धी.... ठाणे, नागपुरात माय नेमचे पोस्टर फाडले...पुन्हा प्रसिद्धी... शाहरुख आणि शिवसेना दोघांचीही प्रत्यक्ष एकमेकांना विरोध करण्याची इच्छा नव्हतीच.. तरीही शाहरुखचे सिनेमाचे खेळ पाडले बंद..पुन्हा प्रसिद्धी... बर्लिनमधून ट्विटरवर शाहरुखची प्रतिक्रिया.. माफी मागण्यास नकार..पुन्हा प्रसिद्धी.. विरोध चित्रपटांना नव्हे तर खानच्या वक्तव्याला, शिवसेनेची भूमिका..पुन्हा प्रसिद्धी.. वाद अजूनही शमलेला नाही..

घटना सहावी- शरद पवारांच्या महागाईबाबतच्या दूरदर्शी वक्तव्यांत महागाई वाढण्याचे संकेत.. पुन्हा प्रसिद्धी.. साखर, दूध महागले..पुन्हा प्रसिद्धी... चुकीचा अर्थ काढतायेत-पवार.. प्रसिद्धी..काँग्रेसकडूनही टीका..पुन्हा प्रसिद्धी .. मी एकटा जबाबदार नाही, पंतप्रधानही जबाबदार-पवार..पुन्हा प्रसिद्धी... पवारांचे खाते काढा, काँग्रेसच्या बैठकीत मागणी..पुन्हा प्रसिद्धी.. पवारांपेक्षा सत्ता मोठी नाही-आर आर पाटील..पुन्हा प्रसिद्धी... साखर न खाल्ल्यानी कुणी मरत नाही, राष्ट्रवादी मासिकातील संपादकीय..पुन्हा प्रसिद्धी.. टीकाकारांकडे दुर्लक्ष करा-पवार, संपादकांचे मत ..पुन्हा प्रसिद्धी

आणि
घटना सातवी-- पुण्यात जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट.. आठ जण ठार, 57 जण जखमी... प्रसिद्धी... बाकी सगळे विषय बाद...

माध्यमांना हे असचं सगळं हवं आहे... एकमेकांत भांडणं तरी लावा.. किंवा कुठेतरी बॉम्बस्फोट तरी करा.. खळबळजनक सतत घडत राहिलं पाहिजे.. त्याच्यातूनच मजा आहे..विषय संपले तर माध्यम संपतील.. तेव्हा सर्वसामान्य माणसांचा विचार न दहशतवादी करणार, न राजकारणी आणि ज्यांनी करायला हवा ती माध्यमही नाही करणार...
त्यामुळे मजा आहे... एकमेव कारण आहे ........

हे धोकादायक आहे आणि समाज असुरक्षित करणारंही