Thursday, December 18, 2014

एकाकी, अस्वस्थ - अश्वत्थामा

माणूस एकाकी असतो म्हणून अस्वस्थ असतो की, आजूबाजूला सगळे गटागटानी किंवा कुणी तरी कुणाच्या सोबत असतं म्हणून जास्त अस्वस्थ असतो. खरं तर माणूस हा तसा समाजशील प्राणी आहे, पण एका ठराविक काळानंतर कुणालाच फार समाजात वावरायला आवडत नाही. त्याला त्याचा त्याचा निवांतपणा एकटेपणा नेहमीच खुणावत राहतो ना.. मग या निमित्तानं एकाकी राहणं ही टर्म तरी नेमकी काय आहे.
गेल्या 10 वर्षांत म्हणजे कळायला लागल्यापासून असं लौकिकार्थानं एकाकी राहणं, हे माझ्या वाट्याला ब-या पैकी आलंय, म्हणजे जवळपास 4 ते 5 वर्ष तरी.. अशी संधी उपलब्ध करुन देणा-यांचे यानिमित्तानं मी आभारही मानतो. पण प्रश्न तो नाहीये.. प्रश्न असा आहे की हे 10 वर्षांपासून वाटायला लागलंय की त्यापूर्वीही आपण एकाकीच होतो.. लौकिकार्थाने कुटुंबवत्सल माणूस होणं, मग त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी उदा. नोकरी, घर, इ.. मिळवणं हेच आपल्याकडचे सिद्धतेचे निकष ठरतायेत का..
एखादा माणूस या सगळ्यापेक्षा वेगळा विचार करतो किंवा करु शकतो, त्याच्या सुखाच्या आणि समाधानाच्या व्याख्या थोड्या वेगळ्या आडवळणानं जाणाऱ्या असल्या तर त्यात अमान्य असणारं ते काय.. मला गेल्या 4 ते 5वर्षांत या बाबी सातत्यानं कळत राहिल्या.. मग आपण ज्या व्यक्तिसोबत उर्वरित आयुष्य व्यथित करण्याचा निर्णय घेतो आहोत, ती व्यक्ती पण त्याच विचारांची असेल तर ठीक, अन्यथा पुन्हा हा एकाकीपणाचा कालखंडच आपल्या पदरात पडणार नाही, याची खात्री कोण देणार
एकटं जगण्यात अधिक मजा आहे, असं कौटुंबिक माणसांना, तर कौटुंबिक जगण्यात अधिक मजा आहे, असं एकटं वाटणाऱ्या माणसाला वाटतं राहतं, म्हणजे एखाद्या लहान मुलाच्या हाती असलेलं डेअरी मिल्क बघून, दुसऱ्या एका लहान मुलाला त्याच्या हाती असलेल्या फाईव्ह स्टारची मजा वाटेनासी होते, तसं आहे का.. अगदी आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या साथीदाराबाबतही हेच होत असतं का, समोरच्याची बायको आपल्या बायकोपेक्षा अधिक सुंदर वाटत राहते का.. या सगळ्याच्या मुळाशी जाताना आपण आपल्या सद्य परिस्थितीबाबत कधीच समाधानी नसतो, म्हणून ती अस्वस्थता असते काय... एखाच माणसासोबत किंवा बाईसोबत सतत राहताना कंटाळा येत असेल का..त्यातही तिचे आणि त्याचे आवडीचे विषय हे परस्परभिन्न असल्यास आणि समाधान आणि सुखाच्या व्याख्याही वेगवेगळ्या असल्यास त्याचा सर्वाधिक फटका दोघांनाही बसत असावा काय..
काही वेळा आपले आई वडील आणि आजूबाजूची मित्रमंडळीही आपल्याला आपल्या स्तरापेक्षा म्हणजे वैचारिक हा, अधिक कमी पातळीवरची भासू शकतात काय.. किंवा झापडेबंद जगण्यातच धन्यता मानून आपणही त्यांच्यासारखचं वागाव असा आग्रह धरुन ते आपल्या वाढीला मारक ठरतात का, किंवा याची दुसरी बाजू आपण उगाचच स्वतला जास्त शहाणे समजतो का..
कुठल्याही परिस्थितीत सुखी राहणारी आणि एकमेकांच्या किंवा कुटुंबाच्या साथीनं उत्तुंग यश मिळवणारीही माणसं याच समाजात आहेत, त्यांचं मला नेहमी कौतुक वाटतं राहिलय, ते भाग्यवान असतात तरी किंवा ते स्वत त्या घडीत व्यवस्थित जमवून तरी घेत असले पाहिजेत.. मग त्यांना अस्वस्थ वाटत नसेल काय कधी, की ते दाखवत नसतील किंवा खरचं त्यांना ते जाणवत पण नसेल..
अस्वस्थता पाठ सोडत नाही म्हणजे नेमकं काय होतं.. म्हणजे कधीकधी एकदम आपण करत असलेल्या कामाचा किंवा त्या क्षणाचा किंवा त्या वर्तमानाचा म्हणू यात हवं तर एकदम कंटाळा वाटायला लागतो.. किंवा एकदम निराशेची लाट येते मनात.. आणि आपण कसं सगळचं चुकीचं करतोय, असं जाणवत राहतं.. खर तर माझ्या अनुभवावरुन करण्यासारखं खूप काही असतं. पुस्तक असतात, सिनेमा असतात, प्रवास असतो, चांगलं खाणं असतं..अगदीच काही नाही तर टीव्ही तरी नक्की असतो.. पण त्या क्षणाला ते सगळं अगदी नकोसं होऊन जातं.. आणि कुणी तरी सोबत असलं की त्या व्यक्तीचा कंटाळा येतो आणि मग या वरील बाबींपैकी एखादी बाब करावी असं वाटायला लागतं.. म्हणजेच आहे त्या परिस्थितीत समाधानी रहायचंच नाही, असा चंग मनाने बांधलेला असतो. 
    मग व्यसनांची निर्मिती या अस्वस्थेतूनच होत राहते काय, आपलं काहीच चुकत नाही, तरी आपल्यासोबतच असं का घडतयं, ही भावना अधिक तीव्र होत जाते, आणि मग माणसांवरचा, आजूबाजूच्या परिस्थितीवरचा आणि देवावरचाही विश्वास उडत जातो काय.. मग काही प्रश्नांची उत्तरे मिळतच नाहीत, असं वाटायला लागतं, मग ती उत्तर शोधण्यापेक्षा समाधानी अवस्थेत जाण्याची धडपड त्याच्या त्याच्या पातळीवर सुरु होते..
मग ती कुणी तरी कुठल्यातरी बाबा-बुवाच्या श्रद्धेच्या पातळीवर, किंवा कुणी तंबाखू, दारु, सिगारेट या पातळीवर ती क्षणिक रिलॅक्सेशनची प्रोसेस अनुभवण्याचा प्रयत्न करत राहतो, किंवा किमान शोधण्याचा प्रयत्न करत राहतो काय, किंवा आपण समाधानी राहूच शकत नाही, अशा एका पातळीवर येऊन हे असचं आहे, आणि असचं पुढेही कायम सतत सुरुच राहणार आहे असं वाटतं राहतं..
आत्महत्या करणं हे यातील एकदम टोकाचं पाऊल असतं काय, कारण एकतर आपण एक नंबरचे भित्रे असतो, त्यामुळे आपल्या सामान्यांच्या कुणाच्याच गांडीत हे सगळं अमान्य आहे म्हणून जीवनयात्रा संपवावी असा टोकाचा विचार करायची हिंमत नसते, आणि मग जी ते करतात त्यांच्याबाबत हळहळ किंवा केवळ मुर्खपणा या दृष्टीनं विचार करुन आपण त्या किंवा तिला बोगस म्हणून ठरवायला आणि आपल्या मनाला ऑल इज वेल असं सांगायला मोकळे होत जातो का..
वैयक्तिक आयुष्यासोबतच ऑफिसमधील ताणतणावाचे प्रसंग, प्रवासातील तणाव या बाबींमुळेही आपण दिवसेंदिवस खचत तरी जातो, किंवा आपण एका सॅच्युरेशन पॉईंटला तरी पोहोचत जातो.. मग हे सर्कल तोडायला हवं असं वाटतं राहत, मग तीच तीच माणसं, तेच तेच काम कंटाळवाणं वाटतं राहतं का, मग त्यासाठी ब्रेक घेऊन सुट्टीवर जातो, पण तिथेही पुन्हा तेच किंवा पुन्हा आल्यावर तेच हीच भावना तीव्रतेने असते का, आणि ती कुणाला जाणवते का..
या सगळ्यातून मग कायमची मुक्ती आपण कशी काय मिळवू शकतो बरं.. मग आपण आपले छंद तरी शोधायला हवेत किंवा आपल्या गुणवत्तेचं म्हणजे आपल्या मानांकनाच्या गुणवत्तेच आयुष्य व्यथित करायला हवं, आता हे गुणवत्तापूर्वक आयुष्य म्हणजे नेमकं काय, हे ज्याचं त्यानी ठरवायला हवं, असं आयुष्य घालवण्याची मुभाही त्या त्या स्त्री-पुरुषाला मिळायला हवी, आपल्यावरच्या तथाकथित जबाबदाऱ्या, समाज काय म्हणेल, या खोट्या कल्पनेचं स्तोम, आपणच ठरवलेल्या झापडबंद सुखी आयुष्याच्या कल्पना, यातून जोपर्यंत आपण मुक्त होत ही तोपर्यंत हे होणं अशक्य आहे.. आणि त्यासाठी लागणारा धीरही जमा करावा लागेल. त्यामुळे एकाकीपण हे नेहमीच तुम्हाला तुमच्या अस्वस्थेसह स्वीकारावंच लागेल आणि त्यातून काही सर्जन मिळेल अशी खोटी अपेक्षा ठेऊन तुम्हाला जगावं तरी लागेल..
मरणाचा शोध घेणारा अश्वत्थामा आणि आपण सगळे सारखेच असतो का, त्याच्या फक्त कपाळावर जखम आहे, आपल्या ह्रद्यात, मेंदूत ती असावी...