Sunday, November 2, 2014

कधीतरी ‘आपलं’ म्हणाच !




पाच वर्षांपूर्वी कुणी असं सांगितलं असतं की 2014 साली राज्यात भाजपचं सरकार येईल, त्यांचा शपथविधी सोहळा वानखेडे स्टेडियमवर होईल आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होतील..तर त्या सांगणाऱ्या इसमाला सगळ्यांनीच वेड्यात काढलं असतं...पण अखेरीस ते वास्तवात आलय. हीच लोकशाहीची खरी ताकद आहे.. या विचारांशी संबंधित असलेल्यांनाही अजून यावर विश्वास बसत नाहीय. त्यामुळे इतरांची तर गोष्टच सोडा.. त्यामुळे अनेकांना पोटशूळ उठलाय.. आणि या ना त्या निमित्तानं सोशल मीडियासह सगळीकडेच काहीही दाखले, उदाहरणे देत भाजपवर टीका करण्याची संधी सोडली जात नाहीये.. कुणी कितीही टीका केली तरी वास्तव मात्र बदलणार नाहीये....
1960 पासून अगदी काही मोजकी वर्षे वगळली तर तीच तीच नेतेमंडळी राज्याचा गाडा हाकताना दिसतायेत.. त्यांतल्या काही नेत्यांचं नेतृत्व आभाळाएवढं होतं.. त्यांना त्यावेळी संधी मिळाली त्यामुळेच ही मंडळी एवढं मोठं काम करु शकली.. बाकीच्या नेतृत्वानंही अगदीच सगळंच चांगलं केलेलं नाही... नाहीतर ही संधी आत्ता मिळालीच नसती.. आता ही संधी काही नव्या चेहऱ्यांना मिळतेय.
राजकारण म्हणजे केवळ गुंड, बिल्डर, कंत्राटदार, अधिकाऱ्यांशी संगनमतं, भ्रष्टाचार, लोचखोरी हे समीकरण झालं होतं.. स्वच्छ प्रतिमेची, सर्वसामान्य घरातील व्यक्ती राजकारण करु शकते, हेच आत्ताआत्तापर्यंत अशक्य वाटतं होतं..त्यामुळेच जनतेच्या मनात असंतोष वाढत होता, बदललेल्या पिढीचा हा हुंकार अण्णांच्या आंदोलनापासून, लोकसभा निवडणुकीत आणि आता विधानसभा निवडणूक निकालाच्या निमित्तानं समोर आलाय... त्यामुळेच केंद्रात आणि राज्यात एका नव्या नेतृत्वाला संधी मिळाली आहे..
राज्याच्या नव्या मंत्रिमंडळातील चेहरे हे रा.स्व.संघ परिवाराच्या मुशीतले निष्ठावान कार्यकर्ते आहेत. अभाविपसारख्या विद्यार्थी चळवळीत काम करत इथपर्यंत प्रवास करणारे नेते आहेत. राजकारणात येण्यापूर्वी समाजकारण करताना, आलेल्या अनुभवांमुळे त्यांना जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण आहे.. स्कॉर्पिओ, बुलोरोच्या एसीत बसून राजकारण करणाऱ्या राजकीय नेत्यांपेक्षा या मंडळींचा पिंड नक्कीच वेगळा आहे..
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात मिळवलेल्या भरघोस यशानंतर जागावाटपापासून ते निकालापर्यंत शिवसेनेला भाजपनं दिलेला धक्काही योग्यच म्हणावा लागेल.. शिवसेना जागावाटपात भाजपला जेवढ्या जागा देऊ इच्छित होती, त्यापेक्षा चार ते पाच जास्त जागा भाजपने स्वबळावर जिंकून दाखवल्या आहेत (अगदी आयाराम-गयारामही गृहित धरले तरी ते आज भाजपच्या झेंड्याखालीच आहेत, हे वास्तव आहेच). कोणताही पक्ष हा विस्तार करण्यासाठीच कार्यरत असतो, आणि तीच भाजपची भूमिका आहे. आता तर आक्रमकेतून बाहेर पडलेली शिवसेना राज्यात सत्तेत सहभागी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या मातब्बर प्रादेशिक पक्षानंही भाजपला बिनशर्त (?) पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केलीय. त्यामुळे आता हे भाजपचं सरकार असणार आणि ते स्थिर असणार याबाबतचे सगळे तर्कवितर्क संपलेले आहेत.. अगदी कितीही टीका झाली तरी..

          अशक्य वाटणारी सत्ता मिळाल्यानं, आता नव्या नेतृत्वाची जबाबदारी वाढली आहे.. सर्वसामान्यांचे नेते म्हणून या मंत्र्यांकडूनच्या अपेक्षाही तितक्याच वाढलेल्या आहेत. शिवछत्रपतींचा आशीर्वाद मागून, सत्तेवर पोहचलेल्या या नेतृत्वाला आता राज्यात खऱ्याअर्थी शिवशाही निर्माण करायची आहे. त्यामुळे सत्तेचा उन्माद न करता, ही मंडळी हे कार्य करतील, अशी अपेक्षा बाळगूयात आणि त्यांना काम करण्याची संधी देऊयात.. याच शुभेच्छा !