Friday, December 26, 2008

एका महिन्यानंतर...

रात्री साडे नऊची वेळ.. विकली ऑफ असल्याने निवांत होतो. बातम्यांशी संबंधित नोकरी असल्याने निवांत बातम्या बघत सुट्टी चालली होती.. तेवढ्यात कुठल्यातरी न्यूज चॅनेलला लिओपोर्ड कॅफेत गोळीबार झाल्याची बातमी आली. त्यानंतर शहरात काही ठिकाणी गोळीबार झाल्याचंही वृत्त होतं.. मी सरसावून गँगवॉर असेल असं समजून टीव्हीसमोर बसलो.. पाहता पाहता हे गोळीबार साधे नसून दहशतवादी हल्ले असल्याचं स्पष्ट व्हायला लागलं.. इतकचं काय तर आपल्या नेहमीच्या व्हीटी स्टेशनवर अंदाधुंद गोळीबार झाल्याच्या आणि बॉम्बस्फोट झाल्याच्याही बातम्या आल्या. आणि खूप मोठा धक्का बसला.. व्हीटी स्टेशन, कामा हॉस्पीटल, मेट्रोजवळ गोळीबार, विधानभवनाजवळ ग्रेनेड हल्ला., विलेपार्लेत टॅक्सीत स्फोट, माझगावात टॅक्सीत स्फोट.. ताज, ओबेरॉयवर हल्ला, नरिमन हाऊसमध्ये अतिरेकी लपले. अश्या बातम्या सारख्या येतच होत्या.. आणि जेवणाची ताटं सारुन त्या रात्रभर मी आणि माझ्या घरातले टीव्हीसमोर अक्षरश: रात्रभर बसून होतो... ज्या व्हीटी स्टेशनवरुन गेले तीन वर्ष रात्री 10.30 ते 11.30 च्या काळात आम्ही बिनघोर येत होतो, ज्या विधानभवन परिसरात नोकरीला होतो, त्याच परिसरात हे सगळं घडलं.. आणि कुठेतरी आत खूप आत एक जबरदस्त धक्का बसला.. कदाचित व्हीटी स्टेशनवर झालेल्या गोळीबारात आपणही मेलो असतो हे जाणवलं.. आणि सुन्न झालो.
आम्ही एक सार्वभौम, गेल्या 50 वर्षांपासून स्वतंत्र आर्थिक प्रगतीच्या शिखराकडे वाटचाल करणा-या देशाचे नागरिक आहोत, देशातल्या सर्वात सुरक्षित शहरात आहोत, इथे आम्हाला कुणाचीही भिती नाही या सगळ्या मनातल्या असलेल्या भावनांचा एका क्षणात हल्ल्याच्या जाणीवेनं चक्काचूर झाला. कुठल्यातरी इतर देशातील कोणीतरी आमच्या देशात समुद्रमार्गाने घुसतात काय, व्हीटी स्टेशनवर हल्ला करुन निरपराध 50-60 लोकांचे जीव घेतात काय आणि आमच्याकडची सर्व सुरक्षायंत्रणा याला अपुरे पडते काय.. सारचं अनपेक्षित... खरं सांगा महिन्याभरापूर्वी व्हीटी स्टेशनवर असा सरसकट गोळीबार होईल, असं कुणी सांगीतलं असतं तर कुणाला तरी खरं वाटलं असतं का हो.. खरंच सगळ्यांनाच मुळापासून हादरवणारी ती 26 नोव्हेंबरची रात्र होती. कुणीच था-यावर नव्हतं. नेमके किती दहशतवादी आहेत, त्यांचं उद्दिष्ट्य काय, ते कुठेकुठे हल्ले करणार आहेत, कुठल्या देशातले आहेत.. किती आरडीएक्स आहे.. हे सर्व प्रश्न फक्त गुंता बनून होते.. प्रशासकीय यंत्रणाही मूकपणे हे सगळं पहात होती. ज्या पोलीस अधिका-यांनी हे थोपवायचा प्रयत्न केला. ते चांगले शूर पोलीस अधिकारी आम्ही गमावून बसलो... हेमंत करकरे, विजय साळस्कर, अशोक कामटे हे तिन्ही अधिकारी एकाचवेळी हल्ल्याला सामोरे जाताना मृत्युमुखी पडतीलं, हेही कुणाला स्वप्नातही खरं वाटलं नव्हतं.. तीही बातमी आम्ही पचवली, मात्र या तिन्ही पोलीस अधिका-यांच्या मृत्युने दहशतवादाचं संकटाची तीव्रता अधिक वाढली. त्यानंतर या दहशतवाद्यांपैकी एकाचा फोटो प्रसिद्धीला आला. तोच तो कसाब.. त्याच्या चेह-यावरचे खूनशी भाव संपूर्ण मानव जातीला काळीमा फासणारे होते.. त्याच्या नजरेतलं क्रौर्य अजूनही त्याच तीव्रतेने आमच्या सगळ्यांच्याच स्मरणात आहे.. कितीतरी दिवसांपासून असलेला माणसं अशी का वागतात, हा प्रश्न अजूनही सुटलेलाच नाही. त्यानंतर दोन दिवस ताज, नरिंमन हाऊस आणि ओबेरॉयमधला दहशतवाद्यांचा मुकाबला आम्ही निमूटपणे पहात होतो. अखेरीस हल्लेखोरांना यमसदनाला धाडलं.. मात्र आम्ही सुरक्षित नाही..याची जाणीव मात्र या हल्ल्यानं आम्हाला फार तीव्रतेने करुन दिली. आत्तापर्यंत कितीतरी स्फोट झाले, तरी असे एकाचवेळी अनेक ठिकाणी हल्ले करण्याची आणि जिवंत दहशतवाद्यांनी गोळ्यांनी संपूर्ण यंत्रणेला धारेवर धरण्याची ही पहिलीच वेळ.. त्यामुळे जनता घाबरली, पोलीस गांगरले.. संपूर्ण यंत्रणा हादरली.. मात्र ती भीती आजही आमच्या मनात तशीच कायम आहे.. मुंबई नंतर एका दिवसात उभी राहिली, अश्या कितीजरी बातम्या आल्या, तरी ती आमची गरज आहे.. आम्ही निर्लज्ज आहोत. बाहेर पडलो नाही, तर आजच्या स्पर्धेच्या युगात जेवायचं काय, हा प्रश्न आमच्यासमोर पडेल. त्यामुळे अपरिहार्यतेतून मुंबई उभी राहिली, त्यात कोणताही आत्मविश्वास नाही. अजमल कसाब आणि इतर नऊ जणांची ( की अधिक काही जणांची) आमच्याशी काय दुश्मनी होती, हे आम्हाला आत्तापर्यंत कळलेलं नाही. आम्ही त्याच शोधात आहोत. आम्हाला मरण मान्य आहे, मात्र अश्या भ्याड पद्धतीनं आणि दुस-या कुणाच्या तरी गोळीनं किंवा बॉम्बस्फोटानं नको.. हे आक्रंदून सांगणा-या व्हेनस डेतल्या नसरुद्दीन शाहसारखी आमची अवस्था आहे. मात्र चित्रपटात शक्य ते करणारा नासीरसारखं आम्ही करु शकत नाही.. सरळमार्गी कॉमन मॅन म्हणून मरणं एवढचं आमचं नशीब आहे.. यानंतर या कृत्याचं राजकारण झालं. जबाबदार कोण याचा शोध झाला. केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे राजीनामे झाले. मात्र अजूनही काही ठोस कारवाई करण्याचं आमच्यात आणि आमच्या सरकारमध्येही धाडस नाही. कारण आम्ही सगळेच हळूहळू मुर्दाड झाले आहोत. हा मुद्दा ता असाच तापत राहीलं, एखादं सरकार पडेल, एखादं उभं राहिल पण ज्यांच्या घरातले दिवे, ज्यांच्या कपाळावरचं कुंकु या हल्ल्यानी नेलं त्यांना कुणीच कसल्याच पद्धतीची भरपाई आम्ही देऊ शकणार नाही. उद्या कधीतरी आपलीही वेळ येईल, आणि या हल्ल्यात मेलो नाही म्हणून भाग्यवान असं समजत पुढचे दिवस आम्हाला काढावे लागणार हे नक्की..
काश्मिरमधल्या परिस्थितीबाबत फक्त पेपरात वाचून आणि टीव्हीत बघणारी परिस्थिती आता आम्हालाही व्यापून उरली आहे. आणि आम्ही या सगळ्याला रोखण्यात अगदी असमर्थ आहोत.. याची जाणीव अधिक गडद अधिक गडद होत राहिली आहे. अखेरीस गाडीत शेजा-यावरचा आमचा विश्वास त्याच्या सॅककडे पाहून अधिक डळमळीत व्हायला लागलाय. कदाचित हेच हे सर्व करणा-यांना अपेक्षित आहे..
याचा कुणी बाजार करो, कुणी त्याचं राजकारण करो.. आज एका महिन्यानंतरही हीच खरी स्थिती आहे, आम्ही खचलेलेच आहोत.. फक्त तीव्रता कमी झालीय आणि उद्या काहीही घडलं तरी हे घडणारचं होतं.. अश्या भाकडं प्रतिक्रिया देण्याशिवाय़ आम्ही काही करु शकणार नाही.
दहशतवाद कसा रोखायचा हाच आम्हाला सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. त्यांना काय हवय, हे आम्हाला माहीत नाही, कदाचित त्यांनाही माहीत नाही.. मात्र अश्या माथेफिरुपणाने संपूर्ण समाजाचं अस्तित्व मात्र टांगणीला लागलय. आणि याचं ठोस उत्तर खरचं कुणाकडेच नाही. कदाचित आम्ही हे सर्व थांबवण्यासाठी हेल्पलेस आहोत.

Thursday, November 20, 2008

आनंदक्षण..

दिलीप कुलकर्णीचं निसर्गायण नावाचं पुस्तक आहे.. खूपच छान आहे.. त्यात त्यांनी भगवंताच्या भेटीसाठी लागणारी आत्मियता म्हणजे काय किंवा तादात्म्य पावणं म्हणजे काय.. किंवा सुख म्हणजे काय याची एक सुंदर व्याख्या केलीय..
ऐन पावसाळ्यात एखाद्या डोंगरावर उभं राहिल्यानंतर समोरचं हिरवंगार रान बघताना काही क्षण आपण स्वत:ला आजूबाजूच्या परिसराला, आपल्या नोकरीला, आई-वडिलांना , संपूर्ण जगाला विसरुन जातो.. काही क्षणाचीच ती एक विलक्षण सुंदर समाधी असते.. आणि ते जे क्षण असतात ते ख-या अर्थी आनंदक्षण... आणि असे क्षण एकत्र राहणे म्हणजे भगवंताशी तादात्म्यता पावणे होय.. संतांच्या भगवंताच्या भेटीच्या क्षणात हे क्षण त्यांच्याकडे सातत्यानं येतात . हे खरं .. तर आत्ताच हा विषय काढण्याची किंवा आठवण्याची गरज काय.. तर परवा एक सुंदर कविता ऐकली..त्यात आनंदक्षण असा उल्लेख आला.. आणि त्या आनंदक्षणावरुन हे सगळं आठवलं.. आता नेहमीच्या धावपळीत असे क्षण वाट्याला फारसे येत नाहीत, हेही खरचं.
जेव्हा शाळेत होतो, तेव्हा असे क्षण वाट्याला पुरेपुर आले आहेत आणि त्याचा आनंद खरोखरच पूर्णपणे उपभोगता आला आहे.. माझं लहानपण पुणे जिल्हात घोडेगाव या गावी गेलं. तिथं फार सुंदर थंडी पडायची.. शनिवारी सकाळी सातची शाळा असायची आणि वर्गात स्वेटर घालून येणा-याला मुलगी म्हणून चिडवलं जायचं.. त्यामुळे कितीही थंडी असली तरी झक्कत वर्गातली सगळी मुलं सकाळी नेहमीच्या शाळेच्या ड्रेसवरच शाळेत यायची.. सकाळी साडे सातला धुक्यातून शाळेत पोहचल्यावर एखादी शेकोटी पेटवून त्याच्या काठावार बसलं.. आणि मित्रमंडळीत कुणाची तरी टवाळी निघाली की असेच काही आनंद क्षण मी उपभोगले आहेत.. आणि आज त्या सगळ्याची आठवण झाली झाली तरी काही क्षण निवांतपणा वाटतो.. दुसरा एक अनुभव सांगतो.. हरिश्चंदंर् गडावर जुलैच्या मध्यात ट्रेकला गेलो होतो आम्ही तिघे बंधू.. त्यातला आज एकजण अमेरिकेत आहे.. वाटेवर एका ठिकाणी कडा चढून गेल्यानंतर सगळे ढग त्या कड्यावर उतरले होते.. कितीतरी वेळ म्हणजे जवळपास वीस मिनीटे आम्ही एकमेकांशी काहीही न बोलता तो आनंद फक्त उपभोगत होते.. खरा आनंदक्षण ..
असे कितीतरी अनुभव आहेत की ज्या क्षणांनी भरभरुन दिलं.. आणि मी भरभरुन उपभोगलं.. काही खाण्यातले आहेत..कही मित्रमंडळीतले आहेत.. काही वाचनातले आहेत काही अजून काही आठवणींचे आहेत.. त्या सर्व क्षणांनी मी अधिकाधिक समृद्ध झालो.. असे क्षण खरे आनंदक्षण ..

Friday, November 14, 2008

तर वेळ हातातून निघून गेलेली असेल...

राज ठाकरेंचं उत्तर भारतीयांविरोधातलं आंदोलन.. विक्रोळीच्या जाहीर सभेत लालूप्रसादापांसून, अमिताभ बच्चनांवर टीका करणा-या राज ठाकरेंच्या आंदोलनाचं स्वरुप आता केकच्या वादापर्यंत येऊन पोहचलं.. या प्रवासात राज्यातल्या म्हणा किंवा मुंबईकरांच्या पदरात खरोखरच काय पडलं.. याचा विचार केला तर थोडीशी अनिश्चितता, राजच्या अटकेमुळे दोन दिवसांची जबरदस्ती सुट्टी आणि सध्याच्या धकाधकीच्या जगण्यातला एक वाढलेला ताप.. याशिवाय दुसरी उत्तर मिळू शकतील असं मला वाटतं नाही..
फारतर काही स्थानिक टग्यांना यानिमित्तानं दादागिरी करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळाला.. आणि हिंदू मुस्लिम, सवर्ण-दलित या संघर्षात राज मराठी विरुद्ध उत्तर भारतीय अश्या नव्या संघर्षाची नांदी मात्र सुरु झाली. राजकारण समोर असल्यानं राज्यातल्या मनसे शिवसेनेनं आणि उत्तर भारतातल्या नेत्यांनी या मुद्द्याचा तापत्या तव्यासारखा वापर करुन घेतला. नाहीतरी विकासापेक्षा भावनिक मुद्द्यावर शक्यतोवर मतदारांना फसवता येईल तितकं फसवण्यासाठी हा मुद्दा अस्मितेशी जोडणार हे नक्की झालय. त्यामुळे येत्या निवडणुकांतही या मुद्द्यावर सतत काही ना काही होत राहील, महाराष्ट्रात राज ठाकरे हिरो राहतील, तर उत्तर भारतात राहुल राज शहीद ठरेल.. आणि यातनं राज्यातल्या उत्तर भारतीयांच्या मनात आणि बाहेरच्या राज्यातल्या मराठी माणसांच्या कुटुंबांच्या मनात एक सतत भीतीची जाणीव मात्र कायम राहील. वाहिन्यांवर सतत याचाच उदो उदो करत हिंदी वाहिन्या राज ठाकरेंच्या विरोधात तर मराठी वाहिन्या राज यांच्या बाजूनं उभं राहतील. यात त्यांचे त्यांचे टीआरपी त्यांना सोडवायचे आहेत, वाढवायचे आहेत.. नंबर वन व्हायचं आहे. प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी आणि सध्याच्या दिशाहिन भरकटलेल्या माध्यमांना हा चांगला मुद्दा दिवसभर पाणी टाकून पिटण्यासाठी मिळाला आहे.. आहे की नाही या सगळ्यांचं कौतुक..
आपल्याच देशात असुरक्षिततेची जाणीव होणं हे किती वाईट आहे.. याचा प्रत्यय या सगळ्यांपैकी कुणालाच नाही.. यातून आपण काय पेरतो आहोत.. या नकारात्मक प्रसिद्धीचा आणि आंदोलनांचा काय परिणाम होईल याची जाणीव नाही किंवा ती आहे मात्र आपल्या स्वार्थापुरता त्याचा विचार करण्याएवढेच मर्यादित राहिलोत..
मनातून काही मंडळी राज यांच्या भूमिकेशी संमत असतीलही , उत्तर भारतीयांवर धाक राहण्यासाठी अश्या भाषणबाजीची गरज आहेही मात्र प्रत्यक्षात रस्त्यावंर येऊन त्याची परिणती जर खून पडण्यात आली, किंवा बाहेरच्या राज्यातल्या एखाद्या मराठी कुटुंबियांना काही इजा पोहचवण्यात झाली, तर सरसकट सगळ्यांनाच आणि त्यातही माध्यमांनाही आपली मान शरमेनं खाली घालायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.
आज केवळ व्यासपीठांवरुन एकमेकांवर होणारे आरोप प्रत्यारोपांचं राजकारण हिंसेत उतरवण्यासाठी निवडणुका जशजश्या जवळ येतील तसतसा जास्त प्रयत्न होईल.. एका वेगळ्याचं कारणावरुन दंगलसृदृश
स्थिती निर्माण होईल, आणि हा करतो मग मी का मागे, यासाठी अन्य काही पक्ष, व्यक्ती, गट यात सहभागी होतील. मात्र याचा परिणाम मात्र सर्वसामान्य माणसांवर होईल.. आधीच सकाळी संध्याकाळी घरी परतायला मिळेल की नाही, या धास्तीनं गाडीला निघणा-या मुंबईकरांच्या जगण्यातली अनिश्चितता मात्र कायमच वाढत राहील.
आत्तापर्यंत काश्मिरात होणारे बॉम्बस्फोट आमच्या आजूबाजूला व्हायला लागलेत, हे आम्ही सहन केलं..
आता समाजात एका वेगळ्या दरीला जन्म देऊन, उत्तर भारतीयांना विरोध करुन भारताचं खंडण करण्याचे हे विचार आहेत, त्यालाही आम्ही कदाचित सहन करु.. मात्र प्रत्यक्षात आपल्याभोवती हेही गंभीर पडसादाच्या स्वरुपात येईल.. तेव्हा त्याला उत्तर देण्यास किंवा सामोरं जाण्यास आम्ही तयार नसू.. कदाचित इतकं होईल असं वाटलं नव्हतं.. अश्या स्वरुपाच्या आपल्या प्रतिक्रिया असतील, मात्र त्यावेळी कदाचित वेळ सगळ्यांच्याच हातातून निघून गेलेली असेल.

Sunday, November 2, 2008

दिवाळी काय देते...

दिवाळी आली आणि गेली.. दिवाळीच्या निमित्तानं आमच्या जगण्यात उगाचच काही दिवे आले , काही लागले.. पण हा आनंद एकत्रित साजरा करु शकलो का.. हा महत्वाचा प्रश्न आहे..
दिवाळी काय असते आपल्या सगळ्यांसाठी, तर या निमित्तानं आपण एकत्र येतो, नाहीतर आपल्या राहटगाड्यात आपल्याला तरी कुठे एकत्र येण्याचे निवांत क्षण मिळतात, नाही का.. कधीतरी एखाद्याचा वीक एंड खूप चांगला साजरा होता खरा.. पण तो त्या एकट्याशी संबंधित राहतो. मात्र दिवाळीचा उत्साह सगळ्यांना असोत. या निमित्तानं घराघरात गोडधोड होतं. नव्या वस्तू येतात. गेल्या वर्षी ठरवलेल्या काही उद्दिष्टांची पूर्ती होते. प्रत्येकाची ध्येय वेगवेगळी असतात खरी, पण ती पूर्ण करण्यासाठी दिवाळीचे टार्गेटस असतात, ते महत्वाचं.. प्रत्येकाच्या ध्येयपूर्तीच्या मर्यादा या वेगवेगळ्या असू शकतात. उदा. काही जणांसाठी टीव्ही असेल, तर एखाद्यासाठी कार, तर एखाद्यासाठी कपडेही..
दिवाळी निमित्तानं आपण अनेकांना शुभेच्छा देतो. एसएमएससारख्या माध्यमातून त्यातले 80 टक्के खोटे, नाटकी असतील किंवा अपरिहार्यतेतून आलेले असतीलही, पण किमान 20 टक्के आपल्या अवतीभोवती असणा-या चांगल्या माणसांनी आठवण आपल्याला या निमित्ताने होते.. त्यांच्याशी गप्पा होतात. सर्वात महत्वाचं दोन दिवस माणसं निवांत असतात... नवरा बायकोला वेळ देतो, बहिण भावाला वेळ देते.. किती महत्वाचं आहे की नाही.. हे सगळं.. नाहीतर धावताना आपण आता सगळचं विसरायला लागलो आहेत.. यात हे काही विरुंगळ्याचे क्षण वर्षभर पुन्हा धवण्याची आणि नव्या ध्येय निश्चितीची एक उमेद देतात. माणसांमाणसांमध्ये संबंध विरळ होत असताना, दिवाळीसारखे सण खरचं काही तरी दिवे घएऊन येतात. मला वाटतं नेहमीच्या जगण्याच्या धावपळीत हे असं काहीतरी असायला हवं बरं नाहीतर आपण कामापाठी वेडे होऊन जाऊ... म्हणूनच जागतिक मंदीच्या वाटेवरही खरेदी कमी झाली असली तरी दिवाळीची उत्साह मात्र आपल्या सगळ्यांच्या मनात तेवढाच राहीला हे महत्वाचं.. थोडे फटाके कमी वाजले असतील, थोडे ग्राहक कमी झाले असले तरी दिवाळी दिवाळीच राहीली..

Tuesday, September 9, 2008

झाडाझडती..

काही दिवसांपूर्वीच विश्वास पाटलांचं झाडाझडती वाचलं... पाटलांचंच पांगिरा, राजन गवस यांचे तणकट, बारोमास या सगळ्यांची एक शृंखला आहे.. या सगळ्यातून महाराष्ट्रातल्या पिडीत समाजाचं खूप चांगलं चित्रण झालंय. असं मला वाटतं. झाडाझडती तर फारच विषण्ण करत. ग्रामीण भागातील व्यवस्था, हेवेदावे, राजकीय राडेबाजी आणि या सगळ्यात भरडला जाणारा सामान्य माणून तुम्हाला पिळवटून टाकतो..
पुस्तकाची रेंज फारच मोठी आहे, कॅनव्हास खूप मोठा आहे.. एवढी पात्र.. त्यांचं आयुष्य हे पुस्तक संपेपर्यंत कुठेही निसटत नाही हे विशेष.. आंबेपूर जिल्ह्यातल्या धरणाच्या प्रकल्पग्रस्तांवर होणा-या अन्यायाची ही कहाणी आहे.. त्यातली सगळी पात्र इतका अन्याय आयुष्यभर सहन करतात, हैबती, त्याची आई आवडाई, खैरमोडे गुरुजी , गुणवंता, शिवराम त्याची विधवा पत्नी, या सगळ्यांशी आपली एक नाळ पुस्तक वाचताना जुळून जाते.. एका वेगळ्याच पण वास्तव जगात हे पुस्तक आपल्याला घेऊन जातं, जागतिकीकरणाच्या काळात अंतर्मुख करणारं हे पुस्तक आहे..
कांदबरीतले दोन प्रसंग फारच अंगावर येतात, पहिलं सोपान मामा याचा मृत्यु झाल्यानंतर झांजववाडीला त्याचा मृतदेह नेताना होणार त्रास कुणालाही दडपायला लावणारा आहे. आणि दुसरा कुशाप्पा राजाचा मुलीच्या लग्नासाठी वाघाच्या शिकारीला जाण्याचा प्रसंग आणि त्यात त्याच्या हातात काहीच न पडणं हे फारच त्रास देणारं आहे.
खासदार, त्यांचा मुलगा, दत्तू सरपंच आणि त्यांचा चमू यांच्यासारखी हरामखोर मंडळी आपल्या आजूबाजूला असतात, पण त्याचं इतकं वास्तव चित्रण कुठेही आढळत नाही. विशेष म्हणजे विश्वास पाटलांचं ग्रामिण भागातला, शेतीतला, बोलीतला अभ्यास खूप प्रकर्षानं जाणवतो. ते स्वत जिल्हाधिकारी आहेत, त्यामुळे त्यांना हे अनुभव नक्कीच आले असतील, मात्र सामान्य माणसांमध्ये समरसून जाऊन, एसी केबीनमध्ये केवळ न राहता, त्यांनी या कादंबरीसाठी घेतलेला विषय हे सगळचं भारावून टाकणारं आहे. ही माणसं एवढं सहन करुन जिवंत कशी राहतात, असा प्रश्न शेवटी शेवटी पडत जातो. आपण काय करतोय, समाजाची काय स्थिती आहे, आपण गुरुजी का होऊ शकत नाही, त्या वणव्यात टिकू शकतो का, असे अनेक स्वतलाच हलवणारे प्रश्न हे पुस्तक वाचल्यानंतर समोर उभे ठाकतात.. मन फार विषण्ण होतं.. पुस्तक वाचत असताना सुमारे पाच दिवस माझ्या कामात माझं अजिबात लक्ष नव्हत.. सारखे पुस्तकातील पात्रे आठवून मन पिळवणूक निघायचं.. एवढी सुंदर कलाकृती उशीरा वाचनात आली, याची खंतही वाटली. एक विषण्णता घेऊनही, इतका वास्तवादी अनुभव देणा-या विश्वास पाटलांना म्हणूनच सलाम, ही माणसं त्यांना भेटली होती का, असा प्रश्न विचारावासा वाटतो.
एकाअर्थी सपूर्ण समाजव्यवस्थेची झाडाझडती घेणारं हे पुस्तक प्रत्येकानी वाचायला हवं, हे नक्की

Monday, May 5, 2008

एक शून्य मी...

पुलंचा एक शून्य मी हे पुस्तक वाचतोय.. त्यात एक शून्य मी.. नावानं पुलंनी एक ललित लिहलय.. फारच सुंदर आहे.. कित्येक वेळेला आपल्या आजूबाजुच्या माणसांमध्ये राहताना आपण खरचं या माणसांमधले आहोत का हा प्रश्न सल करत राहतो..
कित्येकदा ही मंडळी अशी असतात की ती आपली बालपणापासूनची खास असतात.. त्या वेळेला त्यांच्यातलं जे भावणारं असतं, कदाचित ते आत्ताच्या काळात आपल्याला भावत नाही, काही गोष्टींवरुन मनातल्या मनातच खटके उडत राहतात.. आपण जिथे जिथे वावरतो कुटुंबात, ऑफीसात त्या त्या ठिकाणी हे सलत राहतं.. पुलंनी हे खूप छान मांडलय... पुलंनी त्यात म्हटलय की आपल्या अवतीभवतीची अनेक चांगली मंडळी आपल्याला भेटली ती कधीकधी आपल्याला भावली, पण हे सातत्य ब-याचदा राहत नाही.. हेही खरचं.. यात पुलंचा लेख वेगळा असू शकतो आणि माझं मत त्याही पेक्षा वेगळं असू शकतो.. फक्त तो ललित लेख एक निमित्त आहे एवढचं...
ब-याचदा एखाद्या ग्रुपमध्ये असूनही आपण तिथे नाहीच असं वाटतं राहतं.. काहीतरी आपल्याला अभिप्रेत असणारं, आपल्यासाठी आदर्श असणारं इथे काही घडतचं नाही असंही वाटतं.. मग आपण इथे का आहोत असे प्रश्न समोर येतात.. कधीतरी नाहक जगत रहावं लागतय... असंही वाटतं राहतं.. आपण जगण्यात जसजसे खोलखोल जडात राहतो..तसतसा अधिकाधिक गाळच आपल्या हाती राहतो, की काय असं वाटायला लागतं.. समजूतदार वाटणारी माणसं एकदम अनोळखी वागायला लागतात.. आणि आपण हे सगळं समजून घेऊ शकतो म्हणून स्वत:चाच राग राग होतो... पण या सगळ्याला काहीच उत्तर नसतात..हे ही खरचं.. हे सगळं सोडून निघून दूर कुठेतरी जाण्याची कुवतच आपण गमावून बसलोय असं वाटतं राहत.. आणि रिकामेपण अधिक भारुन येतं..
मग सुट्टीच्या दिवशीही कुणाला भेटावसं वाटत नाही, माणसं तेवढ्या वेळापुरतीच पुरेशी वाटतात.. आपले अग्रक्रम निश्चित करुन तसचं रहायला आवडतं.. नेहमीच्या हक्काच्या नाक्यावरही तिचं तीचं माणसं भेटतील म्हणून जाणं टाळावसं वाटतं..
याला कधीतरी आपला जादा शहाणपणा कारणीभूत आहे असं वाटतं... पण रमावं असं खरंच हाती लागत नाही म्हणून आणि पर्याय नाही म्हणूनही तिथे जाणं टाळता येतं नाही..मग सगळ्यांमध्ये असूनही सलतच राहतो.. तो आपला आतला एकटेपणा.......
पुलंनी म्हटलय आपल्याला न आवडणा-या गोष्टी किंवा समाज विघातक गोष्टी आजूबाजूला घडताना शून्यांची बेरीज तेवढी होत राहते...
एखाद्या ठिकाणी कसलातरी अस्वाद घेताना नाहकच मनात एखादा वेगळाच सामाजिक वगैरे विचार डोकावतो.. डोळे क्षणभर पाणावतात.. पण परत वास्तवात येताना ही संमिश्र मनस्थिती का .. हा प्रश्न राहतोच राहतो.. पुलंनी हे सगळं खूप ठळकपणे मांडलय खरं.. मला ते बहुधा जमत नाहीये.. पण ते खूप आतं भावलं असं वाटलं.. कुणीतरी मनातलं लिहलय.. असंही..

Wednesday, April 30, 2008

वाढदिवसाच्या निमित्तानं..

सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याची मुलाखत आयबीएन लोकमत वाहिनीनं पुन्हा दाखवली..त्यातल्या चर्चेतनं सचिन खरचं किती ग्रेट आहे हे जाणवलं.. त्यानं त्या मुलाखतीत म्हटलय.. ग्राउंडवर मिळणारे जे क्षण असतात, ते पुन्हा पुन्हा आयुष्यात मिळत नाहीत, आणि ते क्षण मापायला कोणतलं माप अपुरं असेल.. कुणालाच संपूर्ण जगासमोर हरण्यासाठी जायला आवडणार नाही, हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याही पेक्षा महत्वाचं ग्राऊंडवर मिळणारे असे काही क्षण आहेत की जे आयुष्यभर साथ करतात. मला वाटतं हे कुठेच कधीच ऐकायला मिळालं नसतं, सचिन केवळ मराठीतून बोलला म्हणूच तो असं काही छान बोलला.. जे आयुष्यभर स्मरणात राहीलं.. आज गेल्या 17-18 वर्षआंपासून सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय.. आज हरभजन सिंग आणि श्रीशांतच्या वादात कुणाच्या डोक्यात किती लवकर हवा जाते, हे दिसतंचं , आणि या सगळ्यात सचिन आपोआप मोठ्ठा वाटायला लागतो.. आजही आपण कुणीही त्याला कितीही क्रिकेटवरुन आणि धावांवरुन शिव्या दिल्या, तरी त्याच्यामागे तो खळावा हीच भावना आपल्या मनात सतत असते, तो मैदानावर येतो तेव्ही अनेकांचे रिमोटवरचे हात आपोआप थांबतात. सगळ्या भारतालाच एकाअर्थी आता सचिन काहीतरी उत्तुंग खेळ दाखवणार असं वाटतं.. आजही वीस वर्षांनतरही प्रत्येक मॅचमध्ये असचं वाटतं राहतं.. आणि सचिन जेव्हा खेळतो तेव्ही त्याचं खेळं पाहत राहणं हा एक सुवर्ण योग असतो.. त्याचा प्रत्येक फटका बघताना, त्यातली त्याची बॅटवरची हुकुमत बघताना, त्याचं पदलालित्य बघताना तो कसा ग्रेट आहे, ते सतत दिसत राहतं.. सगळ्या घराघरात आनंद येतो.. हे सुखद क्षण सतत देण्याचे सचिनचे आमच्यावर खरोखरच अनंत उपकार आहेत.. खेळापलीकडे त्याला पाहताना त्याचं शांत संयमी वागणं , त्याची नम्रता त्याल अधिक मोठं करते.. आणि म्हणूनच त्याच्या क्रिकेटवरच्याच काय पण कुठल्याही प्रतिक्रियेला एक विशेष महत्व असतं.. राज्यातल्या ब-याचं घरात पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा.. याचं उदाहरण देताना सचिनचा उल्लेख आवर्जून होतो.. म्हणूनच क्रेकटचा हा वाघ जेव्हा कमी धावांवर एखाद्या चेंडुवर बाद होतो, तेव्हा सामान्य जनता चिडते, ती ब-याचदा त्याच्यापेक्षा स्वत:वर आणि त्या दिवसाच्या नशिबावर चिडते.. सचिन खेळायला हवा.. असं आत कुठेतरी वाटतं म्हणून आणि त्याचं बाद होणं हे आपलं सगळ्याचं बाद होणं वाटतं म्हणून.. सचिन आउट झाल्यानंतर आता काय उरलयं मॅचमध्ये अश्याही प्रतिक्रिया आपसूक उमटतात. सचिन यंदा पस्तिशीचा झाला.. आमच्या पीढीनं त्याचा खेळ प्रत्यक्ष पाहिला, त्याचं मोठेपणं अनुभवलं.. हे खरचं भाग्याचं.. सचिन आज, उद्या कधीतरी खेळ थांबवेल तेव्हीही चाहत्यांच्या अश्याच रागाच्या प्रतिक्रिया असतील, तो जेव्हा शेवटचा चेंडु खेळून ग्राउंडवरुन निघेल तेव्हा भारतीयांच्या घराघरात माणसं ओक्साबोक्सी रडतील.. खरचं सचिनवर आमचं प्रेम आहे.. कुठेतरी आम्हा सगळ्यांनाच त्यानं एक दिशा दाखवलीय. माणसाला ग्लोबल त्याच्या मेहनतीवर कसं होता येतं.. हे त्यानं दाखवलय. आणि त्याच बरोबर ग्राऊंडवरच्या त्या अमूल्य क्षणांसाठी जगणा-या सचिनसारखी आमच्याही जगण्याच्या ग्राउंडवर कधीतरी आम्ही त्याच्या निमित्तानं काही अमूल्य क्षण अनुभवलेत.. हे त्याने दिलं म्हणून त्याचे आणि त्याला बनविणा-या भगवंत या दोघांचेही आभार..

Sunday, April 27, 2008

टिंग्या

गेल्या महिनाभरात दोन सिनेमे बैलाशी संबंधित आले मराठीत.. त्यातला एक वळू आणि दुसरा टिंग्या दोन्ही सिनेमांची बरोबरी नाही, मात्र दोघांचाही अस्सलपणा जास्त भावणारा आहे. दोन्ही चित्रपटांची मांडणी अतिशय सुंदररित्या केलीय. दोन्हींच्या कथानकातून आणि मांडणीतून मराठी सिनेमानं पुर्णपणे कात टाकलीय. हे पुन्हांदा अधोरेखित झालय.
त्यात बोलूयात टिंग्याविषयी.. अस्सल, मातीतलं, रांगडं असा काहीसा उल्लेख या चित्रपटाविषयी करावाच लागेल. हा सिनेमा जिथे घडतो.. म्हणजे टिंग्यांचं आणि त्याच्या मुस्लिम मैत्रीणीचं घरं ही दोन्ही घरं डोंगरात आहेत.. म्हणजेच साधाराण गावापासून लांब असेल्या पाड्यावर किंवा डोंगरावर .. आत्तापर्यंत कुठलाही मराठी सिनेमा तिथपर्यंत पोहचला नव्हता..हे मला अधिक भावलं..
दुसरं टिंग्याची मैत्रीण असते मुस्लिम घरातील.. मात्र हिंदू आणि मुस्लिम यांचा कोणताही भेद सिनेमात शेवटपर्यंत होतच नाही.. अगदी सहज ग्रामीण भागात हे दोन्ही समाज किती गुण्यागोविंदाने नांदतात, याचं फारचं वास्तववादी चित्रण या सिनेमात आलंय.. आणि त्यात या विषयाचा अजिबात बाऊ केलेला नाही.. त्यात काही भाषणबाजीही नाही, आणि कपोलकल्पित प्रसंगही नाहीत.. त्यामुळेच दिग्दर्शकाचे आभार मानायला हवेत.. गावातल्या समाजमनाचं वास्तववादी चित्रण करण्यात टिंग्यानं चांगलीच बाजी मारलीय.
आता मुख्य कथानकासंबंधात.. टिंग्याचं त्याच्या बैलावर असणारं प्रेम.. बैलाला झालेला अपघात, त्यामुळं त्याचं शेतात राबू न शकणं.. टिंग्याच्या बापासमोर यामुळे निर्माण होणारे प्रश्न.. बैलाला विकण्याच्या घेण्यात येणारा निर्णय... त्याला टिंग्याचा असणारा विरोध.. यात हा सिनेमा उलगडत जातो.. त्यातही विशेष म्हणजे टिंग्याचं एवढं लहान असतानाही घरातलं असणारं स्थान, त्याच्या आईबापाचं त्याच्यावर असेललं आणि त्या बैलावर असलेलं प्रेम कुठेही न सांगता अतिशय व्यवस्थित मांडण्यात आलंय. दोन प्रसंग मला अतिशय आवडले ते ही लिहतो..
1. टिंग्या बैलावर उपचारासाठी डॉक्टर आणायला कुमालाही न संगता ओतूरला जातो.. फक्त त्याच्या मैत्रीणीकडे आलेल्या डॉक्टरांच्या मोटारसायकलवर ओतूरचं नाव बघून.. आणि त्या डॉक्टरकडे पोहचल्यावर तो जनावरांचा डॉक्टर नाही हे कळल्यावर टिंग्या ढसढसा रडतो.. हे कुठेतरी आत खूप अंतर्मुख करतं.. एवढं निरागस प्रेम खरचं कुणी कुणावर करतं का हो..
2. दुसरा प्रसंग बाजारात नेण्यासाठी तालुक्याच्या गावी या बैलाला घेऊन जातात, टिंग्या बापाच्या मागे नेऊ नकोस म्हणून जात असतो. त्याचा बाप त्याला नाही म्हणत असताना मध्येच बरोबर चल म्हणून संगतो.. बैलाला चालता येत नसल्यानं टिंग्याचा मोठा भाऊ त्याला मागून मारत असतो..बैलाला लागतय हे लक्षात आल्यावर टिंग्या भावाला पुढे जायला सांगतो आणि संवत मागे राहतो.. आणि बैलाला लागू नये मात्र आवाज तर यायला हवा म्हणून स्वत:च्या पायावर चाबकाचे फटकारे मारत निघतो.. हे फार अंगावर येतं.. इतक्या आपल्या लाडक्या प्राण्याला बाजारात कापण्यासाठी नेणा-या टिंग्याच्या मनात काय येत असेल..
चित्रपटातला मपला तुपला हे शब्दप्रयोग अती आहेत, असं वाटलं. सर्रासपणे एवढं बोललं जात नाही.. दुसरं टिंग्याच्या मोठ्या भावाला म्हणजे तोही शाळेतच असतो..त्याला या सगळ्याशी काहीही घेणंदेणं नाहीये.. त्याला देण्यात येणारी स्पेसही आणि त्याच्या बेदरकार वागण्यामुळे टिंग्या जास्त उठून येतो.. टिग्याची आई, त्याच्या मैत्रीणीची मरणारी आजी, हे सगळेच अंतर्मुख करत राहतात.. टिंग्याच्या बापाची अवस्था काय होत असेल, हातातलं बियाणं पेरण्यासाठी त्याची चाललेली घालमेल, याच्यासाठी घरातला भाग असलेल्या बैलाला विकावं लागण्याचा घ्यावा लागणारा निर्णय. त्याच्यावर असलेलं कर्ज..त्यात येणारे आत्महत्येचे विचार.. कुठेतरी वास्तवाची ठोस जाणीव करुन देतात... हे थांबवणं इतकं सोप्प नाही, हे लक्षात येतं जातं.. आणि सिनेमा पकड घेत जातो.. लहानग्या टिंग्याच्या बैलावरील अश्राप प्रेमापोटी हा चित्रपट कायम स्मरणात राहतो.. पाडस कादंबरीची आणि मजीद मजिदीच्या चिल्ड्रेन इन हेवनची आठवणही या निमित्तानं याच्याशी लांबून येते.. बैलाला विकण्यासाठी नेणार असल्याच्या आदल्या रात्री टिंग्या त्या बैलाच्या समोर जाऊन बैलाच्या पाठीवर हात ठेउन जे ढसाढसा रडतो.. ते बाहेर येईपर्यंत विसरताच येत नाही.. त्यामुळेच कुठेतरी खोल आत टिंग्या वस्तीला राहतो.. या नव्या दिग्दर्शकाच्या एवढ्या सुंदर कलाकृतीला आपला सलाम..

Saturday, April 26, 2008

विक्रम आणि विराग..

नवी मुंबईतल्या एका मॉलमध्ये विराग वानखेडे या मराठी तरुणानं सलग सहा दिवस, सहा रात्री गाऊन एक नवा विश्व विक्रम प्रस्थापित केला. त्याची फारशी दखल कोणत्याही माध्यमानं घेतली नाही, नाही म्हणायला मराठी न्यूज चॅनेलमध्ये ही बातमी हेडलाईन झाली. मात्र एरवी मुंबईतल्या छोट्या छोट्या गोष्टींचा पराचा कावळा करणारा हिंदी मिडीया मात्र यापासून दूरच राहिला. याची काही कारणंही असावीत, विराग हा काही मुलगी नव्हता. दुसरं त्याचा काही वेगळा पीआर नसावा.. आणि नवी मुंबईला ओबी पाठवण्याइतपत विराग या मिडीयाला महत्वाचा वाटला नसावा, शनिवारसारखा दिवस असूनही त्याला प्रसिद्धी मिळू नये, हे थोडसं खेदकारक वाटलं.. मराठी चॅनेल्सही या विषयावर अर्धा अर्धा तास खेचू शकले असते, पण ते कोणी केलं नाही.. कारण माहिती नाहीत, पण यामुळे विरागचा उत्साह कमी होत नाही, कादाचित तो बोगस गात असावा असंही एका सहका-यानं मला सुचवलं.. मात्र यापेक्षाही सहा दिवस सहा रात्री गाण्याची त्याची निष्ठा मला जास्त महत्वाची वाटते.. विषय फक्त विरागचा नाही, तर कोणीही ज्याची ध्येयनिश्चिती असेल, आणि ते मिळवण्यासाठी त्यानं केलेले प्रयत्न असतील ते आपण नाकारुच शकत नाही.. काहीतरी एखादं ध्येय ठरवावं लागतं, ते कधी कमी पल्ल्याचं किंवा कधी जीवनध्येय असंत आणि ते मिळवण्यासाठी मातीत गाडून घ्यावं लागतं.. त्यात यश मिळतचं असं नाही, मात्र त्यातून कुठेतरी विनोबा, महात्मा, निर्माण होतात. सध्याच्या गुडीगुडीच्या जमान्यात कमी कष्टात गाडून घेण्याची आपली कुवत कमी होत चाललीय. किंवा या सगळ्याला आपण मनी टर्मस मध्ये मोजायला लागलो आहोत.. परवा मी एकाच कुटुंबातील दोघांना भेटलो.. एक काका आणि त्यांची पुतणी.. डोंबिवलीतील मध्यमवर्गीय कुटुंबापैकीच एक.. त्यातील काकांनी सज्जनगडावर समर्थांच्या सेवेसाठी जीवन समर्पित कलंय. तर त्यांच्या पुतणीनं रसायनशास्त्रात पीएचडी करुन पुढील अभ्यास अमेरिकेत केला. आणि आता ती टेक्सासमध्येच राहते. आपल्या ध्येयांसाठी लग्न न करण्याचा निर्णय या दोघांनीही घेतलाय. या दोघांची कुणी दखल घ्यावी, असं त्यांनाही वाटतं नाही, आणि या निमित्तानं हे सांगण्याचा प्रयत्नही नाही, मात्र एखादं ध्येय ठरवून त्यात गाडून घेउन जे यश मिळतं, त्याचा आनंद काहीतरी निराळाच असतो.. आज माझ्याकडेही तो नाही, म्हणून हे जास्त जाणवतं.. जे ध्येय ठरवण्याचा निर्णय मनापासून सगळी बंधन झुगारुन घेऊ शकतात, त्यांच्याबद्दल जास्त आदर वाटतो.. स्वातंत्र्यपूर्व काळात अशी ध्येय आजूबाजूला होती आणि त्या ताकदीची माणसंही होती, सध्या सगळ्याच क्षेत्राचा बाजार झाल्यामुळं किंवा यशाचे निकष बदलल्यामुळे म्हणा संस्थात्मक कार्य करणा-यांची संख्या कमी होत चाललीय. म्हणूनच आजही कुठल्याही एखाद्या क्षेत्रात स्वत:ला बाप म्हणून सिद्ध करणा-यांचा आदर वाटतो.. आणि जे हा निर्णय परिस्थितीच्या रेट्यानं घेतात, मात्र त्यांची ताकद असेल तर तिथेही ते स्वत:ला सिद्ध करु शकतातच.. फक्त खंत वाटते ती सगळं झुगारुन देऊन काहीतरी करण्याची ओढ आजूबाजूला कुणातच जाणवत नाही, स्वत:चाही याबाबतीत कोंडमारा होतो. त्यासाठी द्यावा लागणारा वेळ, पैसा आणि उपल्ब्ध वेळ, जबाबदा-या याचा मेळ जमत नाही.. पण म्हणूनच एखाद्या ठिकाणी गाडून घेऊन काम करणा-या प्रत्येकाला सलाम कारावासा वाटतो.. म्हणूनच गेली चार वर्षे विक्रमासाठी मेहनत करणारा विराग या साखळीतलाच एक भाग आहे, असं मला वाटतं..

एक अनुभव..

रात्रपाळीसाठी घरातनं निघालो.. घरी कुणीही नव्हतो.. जेवायला एका हॉटेलात गेलो..
स्वाभाविक रात्री 9ची वेळ असल्यानं हॉटेलात गर्दी होती.. कुठे बसायचं.. हे ठरवत असताना
एका टेबलावर एक अंधळा मुलगा जेवताना दिसला..
त्याचे कपडे फाटके होते.. थोडेसे मळलेलेही होते..
एवढ्या चांगल्या हॉटेलात तो एकटाच न शोभणारा असा दिसत होता..
त्याच्या शेजारच्याच टेबलावर जेवायला बसलो.. माझ्या आजूबाजूच्या चार टेबलांवरील
माणसांचं लक्ष त्या अंधळ्या माणसाकडं होतं. त्याच्या पुढ्यात भात होता,
त्यात ओतलेलं वरण त्याला दिसत नव्हतं. त्याला पाणी देणारा पो-या त्याला
तो भात कालव असा आग्रह करीत होता. पण त्या बिचा-याला त्याची कल्पनाही नव्हती..
माझ्या समोरच्या टेबलावर बसलेला एक माणूस जेवताना त्या अंधळ्याकडं बघत होता.
वेटरला बोलवून आपल्या ताटातलं दही आणि स्वीट त्यानं त्या अंधळ्याला द्यायला लावलं.
माझंही जेवण आटोपत आलं होतं. तेवढ्यात त्या अंधळ्या माणसांचही जेवण संपलं. तो उठला..
काउंटरला गेला , तर आलेलं बील भरायला त्याच्या खिशात पैसेच नव्हते. त्यानं त्याचे सगळे खिसे तपासले. मात्र त्याच्या खिशात पैसेच नव्हते.. हॉटेलमालकानं एका शब्दानंही न हटकता त्याला जाउ दिलं. मी बील द्यालया काउंटरवर गेल्यावर शंभराची नोट दिली.. आणि त्या अंधळ्या मुलाचे पैसेही माझ्या बीलाबरोबर घ्या असा आग्रह केला. मात्र हॉटेलमालकानं मला नकार दिला. असे रोजच येतात हेही त्यानं मला सांगीतलं.. त्याच्यासोबत आलेल्या माणसानं त्या अंधळ्याला हॉटेलात सोडताना त्याच्या खिशातील 20 रुपयांची नोट पळवल्याचंही त्यानं सांगीतलं. तो पैसे पळविणारा एका बाजूला, तर त्याला भात कालवण्याचा आग्रह धरणारा पो-या, दही देणारा ग्राहक, बील न घेणारा हॉटेलमालक आणि त्याचं बील भरणारा मी, असे दुस-या बाजूला होतो. आम्ही कुणीच कुणाला ओळखत नव्हतो.. यापुढे भेटण्याची शक्यताही नव्हती.. पण हॉटेलमालकाच्या या सांगण्याने माझे डोळे भरुन आले.. जगात चांगुलपणा नाही अशी ओरड सगळीकडे होत असताना
कोणीही बडेजाव न मिरवता सहज त्या अंधळ्याला पोटभर मिळावं
यासाठी प्रयत्न करीत होतो.. यात दयाही नव्हती.. एक माणूस म्हणून दुस-या माणसाबद्दल वाटणारा जिव्हाळा होता..
एरवी त्या हॉटेलमालकाच्या गब्बरपणामुळे
त्याच्याबद्दल वाटणारा एक आतला संताप क्षणात नष्ट झाला. त्याला आशिर्वाद द्यावेसे वाटले
ते दिलेही.. पण मनातल्या मनात.. मी काहीही केलं नव्हतं.. मी पैसेही दिले नव्हते..पण आत कुठेतरी खूप समाधानानं मी स्टेशनवर गाडी पकडायला आलो.. आत कुठेतरी आपण सुरक्षित आहोत.. इथे चांगुलपणा आहे.. असं उगाचच आत कुठेतरी वाटलं.. आणि तो दिवस आनंदात गेला..

सुरुवातीला थोडसं...

मी काही लेखक नाही, किंवा अभ्यासूही नाही.. मी एक सामान्य माणूस आहे..
पण माझ्या जगण्यात मी जे काही बघतो, पाहतो,
मला जे सुचतं.. मला जे भावतं.. जे कुठेतरी आत अंतर्मुख करतं..
किंवा ज्यापुढे मला वाकावसं वाटतं.. अश्या काही आदर्शांची काही प्रसंगाची
काही सर्जनाची कुठेतरी नोंद व्हावी, असं फार आतून वाटतं..
ते कुठेतरी उतरवायला हवं.. असंही फार आतून वाटतं..
आताशा ही गरज जास्त वाटते.. यातनं काही अनुभव शेअर करता येतात का,
काही अधिक चांगलं पदरात पडेल का.. या सगळ्याचा हा शोध आहे..
कदाचित स्वत:चाही.. सगळ्यांसमोरचा..
बघुयात काय पदरात पडतयं ते..