ऑफिसच्या धबगड्यातनं सुट्टी काढून कुठेतरी जावं, असं खूप दिवसांपासून मनात होतं.. त्यात बायको आणि माझ्या सुट्टीच्या वेळा एकत्र येत नसल्यानं कुठेतरी दूर जाणं अशक्यप्राय होऊन बसलं होतं... अखेर वैतागून 10 डिसेंबरला ठरवलं.. आणि 12 डिसेंबर ते 17 डिसेंबर अशी सात दिवसांची सुट्टीची परवानगी मिळवली आणि जामनगरला जायचं नक्की केलं...
एकतर सर्वात मुख्य हेतू म्हणजे तिथे असलेल्या माझ्या भाच्याला भेटणं... तन्मय त्याचं नाव.. अडिच वर्षाच्या या पोराचं बाळंतपण आमच्या बदलापूरच्या घरात झालंय.. त्यामुळे त्याचा आमच्या घरात सगळ्यांना विलक्षण लळा आहे... त्याला सुरुवातीचे तीन महिने आम्ही अक्षरश: हातावर वाढवलय. ( कारण तो झोपत नसे आणि रात्री घरी गेलो की दिवसभर कंटाळेल्या आई आणि भगिनींची सुटका करण्यासाठी त्याला कुशीत घेऊन, फे-या मारुन झोपवणे ही माझी जबाबदारी असे..) त्या सगळ्या काळात आम्ही म्हणजे सगळ्यांनीच खूप छान आनंद लुटलाय. त्यात आपल्या धाकट्या बहिणीचा मुलगा हे तर अगदीच अप्रूप त्यामुळे त्याला भेटण्यासाठी माझा जीव अगदी अधीर झाला होता. त्यातच तो आता छानसा बोलूही लागलाय.. वर्षभरातून त्याची भेट तशी दोन-तिनदा होते, पण प्रत्येक वेळेला त्याच्या भेटीची ओढही भन्नाट असते... ती शब्दात व्यक्त करणं तसं अशक्यप्राय आहे... आणि धाकट्या बहिणीला तिच्या संसारात यजमानांसह रमताना बघण्याचा अनुभवही छानचं...
दुसरं एक कारण म्हणजे अपर्णा माझी बहिण ज्या ठिकाणी रहाते, ते आहे रिलायन्सची जामनगरची टाऊनशिप.. तिथे शांतता म्हणजे खरोखरच निवांतपणा असतो... गेल्यावेळी मी गेलो तेव्हा हा तिथला प्लस पॉईंट माझ्या लक्षात आला होता... त्यामुळे निव्वळ आराम करता यावा आणि जिथे आमचं चॅनेल अजिबात दिसणार नाही, याची काळजी घेता येऊल असं ठिकाण म्हणून मी जामनगर ही निवड केली..
जामगरला जाताना नेहमीप्रमाणे चेतन भगतचं नवीन पुस्तक टू स्टेटस माझ्या बरोबर होतच.. गेल्या वेळी जामनगर दौ-यात मी चेतन भगतचंच थ्री मिस्टेक्स इन माय लाईफ हे पूर्ण केलेलं... त्यामुळे दरवर्षी चेतन भगतनं माझ्या जामनगर दौ-यासाठी एक पुस्त लिहावं असं मला आवर्जून वाटतं..
तिसरं एक महत्वाचं कारण म्हणजे गुजरातला गेल्यावर मोठ्ठा प्रवास करायला मिळेल याबाबत मी निश्चिंत होतो... कारण मी गेलो म्हणजे हेमंत ( अपर्णाचे अहो), अपर्णा, तन्मय आणि मी कुठेतरी भटकायला जाणारच.. दुसरं म्हणजे त्यांनी नुकतीच नवी कार घेतल्याने तिच्यातूनही फिरुन होईल, अशा सर्व विषयांचा विचार करुन योग्य ठिकाणाची निवड केल्याचं समाधान होतं.. मी निघाल्यापासून छानच थंडी होती आणि सात दिवसांचा आराम ही कुणालाही रोज लोकलने ऑफीसला जाणा-या-येणा-नांच समजेल अशा सुखात मी प्रवास पूर्ण केला..
मी गेल्यावर लगेचच दुस-या दिवशी आमचा बाहेर जेवायला जाण्याचा बेत नक्की झाला.. आणि जवळ असलेल्या खंबालिया गावात एक मिलन नावाचा कुठलातरी ढाबा आहे आणि तिथे जेवायला जायचंय एवढचं ठरलं... त्या छाब्याबाबत त्या परिसरात मोठी मान्यता असल्यानं, दुपारचं जेवण जरा स्किपच केलं... आम्ही संध्याकाळी सात-आठच्या सुमारास जामनगरहून तर निघालो.. खंबालिया जामनगरहून अर्ध्या तासावर आहे... आम्ही छानपैकी एका समुद्रकिना-याच्या अयशस्वी शोधानंतर अखेर आमची गाडी या मिलनच्या शोधात वळवली.. विशेष म्हणजे गेल्या तीन एक वर्षांपासून तिथे राहत असूनही आमचे जावईबापू आणि भगिनी तिकडे फिरकल्या नव्हत्या... मग खंबालियात गेल्यावर टिपिकल ढाब्याचा शोध घेत असतानाच, एका कोप-यावर तो मिलन ढाबा असेल असं कोणीतरी सांगीतलं.. गेल्यावर ते एक टिपिकल हॉटेल निघालं.. पूर्वी कधीतरी याचा ढाबा असवा असा माझा समज झाला.. म्हणजे तो आम्ही तिथे करुन घेतला... खरतरं तिथला एकूण लूक बघून मनातून छोडासा निराशच झालो होतो... मात्र अखेर आम्ही जेवणाच्या टेबलवर बसलो.. आणि आम्ही खरोखरच स्वर्गसुखाचा आनंद घेतला.. गेल्यानरच टेबलावर ठेवण्यात आलेली काकडी-दह्याची कोशिंबिर, लोणची, गोड-तिखट गुजराथी चटण्या आणि मिरच्या यांनी आमचं टेबलावर स्वागत केलं.. प्रत्येक टेबलावर हे पदार्थ असेच कॉम्प्लिमेंटरी ठेवण्यात आले होते.. त्यानंतर आम्ही ऑर्डर दिली..त्यात या काठेवाडी भागातील खास प्रकार उंदिया ( ही भाजी काही डाळींपासून बनवतात आणि खास करुन संक्रांतीच्या काळात या भाजीला या परिसरात विशेष महत्व आहे.) वांग्यांची भाजी, ताक ( याबबद्दल नंतर लिहिनच..) , शेव-टॅमेटो ( हाही या भागात मिळणारा अफलातून प्रकार आहे. ) हे सर्व पदार्थ एकत्रित आले.. उंदिया आणि वांग्याची भाजी यांना तेल आणि तिखटाची चव असूनही त्यात एक गोडवा होता. विशेष म्हणजे इथे पोळ्या आणि ढेपले असे दोन ऑप्शन्स खाण्यासाठी होते. हॉटेलात एका बाजूला सात ते आठ बायका स्टोव्ह घेऊन बसल्या होत्या. त्यांच्या कृपेने गरमागरम पोळ्या किंवा ढेपले आमच्या ताटात पडत होते.. त्यामुळे डिसेंबरच्या थंडीत अशा गरमागरम खाण्याची लज्जत काय असते... हे खवय्यांना सांगायला नकोच... त्यात विशेष कळस केला तो इथल्या ताकाने..घट्ट , पांढरेभुभ्र आणि थंडगार ताक असल्यामुळे, पाण्याऐवजी आम्ही सगळ्यांनीच ताक पिणेच पसंत केले... आता सांगायला हरकत नाही, पण मी किमान या जेवणात आठ ते दहा ग्लास ताक प्यायलो... असा छान जेवण्याचा आनंद गुजरातमध्ये वाळवंटी प्रदेशात एखाद्या शहरात मिळावा..हे म्हणजे सुट्टीच्या दुधात साखर मिळाल्यासारखं झालं... तर असा हा छान स्वर्गीय भोजनाचा आनंद उपभोगून नंतर आम्ही छानशी जुनी गाणी ऐकत रात्री साडे नऊ दहाच्या सुमारास जामनगरला परतलो..
त्यानंतर दुस-याच दिवशी आम्ही सकाळी द्वारकेला गेलो... द्वारका, बेट द्वारका, नागेश्वर ज्योतिर्लिंग आणि एका छानश्या समुद्रकिना-यावर आमची ही दिवसभराची ट्रीप झाली.. त्यातही सांगायचं म्हणजे ज्या समुद्रकिनारी आम्ही गेलो होतो...तिथल्या एवढा शांतपणा आजतागायत मी कोणत्याही समुद्रकिना-यावर अनुभवला नाही... मात्र सकाळपासून या संपूर्ण प्रवासात आम्हाला कुठेही छानसं असं काही खायला मिळालं नव्हतंच.. त्यामुळे अखेर परतताना दिवसभराच्या उपासानंतर आम्ही सगळेच भुकेलेले होतो... आणि येणारा रस्ता हा खंबालिया मार्गेच असल्यानं त्या दिवशीही भोजनासाठी आम्हाला पुन्हा एकदा मिलनची पर्वणी अनुभवता आली...
या सगळ्या सुट्टीत मी मनापासून एन्जॉय केलं.. दोन-तीन सिनेमे, त्यात पा आणि रॉकेटसिंगचा समावेश.. अपर्णा , हेमंत आणि तन्मयची मस्त कंपनी आणि भरपूर प्रवास यामुळे मुंबईत परतण्यापूर्वी मी ताजातवाना झालो नसतो तरच नवल... ही सुट्टी संपूच नये असं वाटत असतानाच अचानक उद्या निघायचं हे लक्षात आल्यानं मन थोडसं खुट्टु झालं... परताना गेटवर पोहचवायला आलेल्या तन्मयला सोडून येताना दरवेळेप्रमाणे याहीवेळी पाणी तरळलंच.. आणि माझा मुंबईकडचा प्रवास पुन्हा सुरु झाला.. मनातल्या मनात मी अपर्णा, हेमंत आणि तन्मयला थँक्स म्हटलं.. आणि पुन्हा रोजच्या धकाधकीत नव्या उर्जेनं दाखल होण्यासाठी पुन्हा सज्ज झालो...
आता या संपूर्ण सुट्टीला दोन महिने उलटून गेले... आत्ताच हे लिहण्याचा कारण म्हणजे त्या आठवणींचा पुनर्प्रत्यय अनुभवावा हा मुख्य उद्देश.. खरतरं फक्त मिलनबद्दल लिहावं असं डोक्यात होतं.. मात्र त्या हॉटेलातील खाण्याच्या पदार्थांचे फोटो मोबाईलमधून डिलीट झाले.. त्यामुळे या सर्व प्रवासाचाच हा एक वृत्तांत..
No comments:
Post a Comment