Wednesday, October 26, 2011

डोंबिवलीकरांचा ‘फडके’ उत्साहनाक्यावरची मित्र मंडळी नेहमीचीच... मात्र अशा अनेक नाक्या नाक्यांवरचे ग्रुप्स.. त्यात नुसतेच मित्र नव्हेत तर असंख्य मैत्रिणीही... तेही नव्या कपड्यांत.. नव्या उत्साहात... अशा हजारो जणांची एक एकत्र मैफल तीही रस्त्यावर.. रस्ता अडवून... असं अनुभवलंय कधी.. नाही मी पण नव्हतं अनुभवलं.. पण आज डोंबिवलीच्या फडके रोडवर लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं हजारोंच्या संख्येनं जमलेल्या तरुणाईचा उत्साह अनुभवला आणि दिवसभर तोच मनात घर करून राहिला... नव्हे फडके रोडवर जाण्यानं दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला...

गेल्या सात-आठ वर्षांपासून डोंबिवलीच्या फडके रोडवरच्या गुढीपाडवा आणि दिवाळीच्या गर्दीविषयी ऐकत होतो..टीव्हीवर पाहत होतो... त्यात काय नुसतीच गर्दी आणि लफडी अशी डोंबिवलीकर नसल्यानं असलेली एक उपेक्षित भावनाही त्यामागं होती.. मात्र आज या एकत्रित उत्सवाची काय मौज आहे.. नुसतचं एकत्र जमण्यापेक्षाही त्यातल्या जिव्हाळ्याची जाणीव झाली.. आणि इतकं वर्ष आपण आपल्या ठिकाणी हे मिस करत आलो.. असं खरोखरचं जाणवलं..

गणपती मंदिराच्या परिसरात आणि फडके रोडवर जमलेली हजारोंची गर्दी.. गर्दीचं सरासरी वय २० ते ४० वर्ष.. अनेक वर्षांनी एकमेकांच्या होणाऱ्या भेटी.. गर्दीतही मी इथे मॉर्डन कॅफेजवळ आहे.. तू तिकडे काय करतोयेस.. मी इथे मंदिराच्या बाहेर आहे.. असे आपुलकीनं एकमेकांसाठी घणघणणारे मोबाईल.. जिव्हाळाच्या मित्रांच्या गळाभेटी.. मैत्रिणींची आपुलकीनं होणारी चौकशी.. सध्या काय चाललंय, अशी होणारी विचारपूस.. काही जणांची गर्दीतही चाललेली, मात्र ग्रुपपुरतीच मर्यादित असलेली भंकस.. एवढी हजारो माणसं.. कोणत्याही निमंत्रणाशिवाय, केवळ आपुलकीच्या नात्यानं जमा होतात.. हे अप्रूप वाटलं..
सगळ्यात महत्त्वाचं जाणवलं तो म्हणजे निवांतपणा.. एरवी रहदारी आणि व्यवहारांनी गजबजलेल्या फडके रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा नाही, अशी परिस्थिती.. सगळे व्यवहार ठप्प.. फक्त एकत्र जमलेली मंडळी आणि त्यांच्या एकमेकांशी चाललेल्या गप्पा.. एरवी लोकमध्ये शिरताना आणि डोंबिवलीत उतरताना दिसणारी प्रचंड नकोशी गर्दी एवढी सुंदरही असू शकते.. हे जाणवलं..
डोंबिवलीचं गणपती मंदिर हे या सगळ्यांना जोडणारं एक स्थान.. दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंगस्नानानंतर मंदिरात दर्शनाला येण्याची प्रथा.. पण त्याचं असं उत्साहात रुपांतर झालय... एरवी दिवाळी हा आपल्यापुरता, आपल्या कुटुंबाकरता फार तर आपल्या काका, मामा अशा नातेवाईकांसाठी साजरा होणारा सण इतक्या मोठ्या गर्दीत आपुलकीनं, जिव्हाळ्यानं साजरा होऊ शकतो.. हेच अधिक आवडलं.. आपआपल्या शहरातंही आपण असे एकत्र येऊ शकत नाही का.. असा प्रश्नही मनाला पडला..
एवढी गर्दी असतानाही या गर्दीला एक स्वयंशिस्त होती.. एरवी गुढीपाडव्याला इथं जमणारी मंडळी ही कुठल्यातरी संस्थांशी संबंधित असतात.. किंवा त्या मागे एक मोठी यंत्रणा कार्यरत असते..मात्र नरक चतुर्दशीच्या दिवशी या ठिकाणी जमलेली ही गर्दी स्वयंस्फूर्तीची असते.. गर्दीत काही जण काळे-गोरे असणारच मात्र ती सर्वांना त्रासदायक नक्कीच नव्हती.. एवढ्या तुडुंब गर्दीतही रस्त्यावरच्या मोठ्या रांगोळीचं महत्त्व सगळ्यांनाच माहित होतं.. आणि एवढ्या गर्दीतही फटाक्यांच्या माळा फुटल्यानंतरही कोणीही त्याबाबत साधा आक्षेप घेत नव्हतं..सगळेचजण एकमेकांच्या आनंदाच्या आड येणार नाहीत याची दक्षता स्वत:हून घेत होते..
जगात नाती विरळ होत असताना.. संवाद साधावा अशी माणसं शोधावी लागत असताना केवळ एकमेकांसाठी वर्षभरातून तरी फडके रोडवर भेट होईलच या आशेपोटी हजारो मंडळी इथं आवर्जून एकत्र येतात.. यातली काही मंडळी चांगल्या हुद्द्यावर असतील.. एरवी धावपळीतही असतील.. पण गाड्या बाजूला ठेऊन पायी फिरून या आपुलकीच्या भेटी नक्कीच वर्षभरासाठी पुरून ठरणाऱ्या असतील.. उदा.. एखादी राहून गेलेली प्रेमाची भरलेली जखमही याच गर्दीत कुठेतरी कडेवरच्या मुलासह दिसली.. आणि आपलं लग्नही झालेलं असलं तरी तिच्या त्या एका लूकमुळं पुढच्या वर्षभराची उमेद नक्कीच जखमेवरच्या खपलीसह मिळत असेल.. नाही का..
इथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही सादर होतात आणि त्यातही तोल ढळू न देण्याचा प्रयत्न प्रकर्षानं दिसून येतो.. हे शहराच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारं आहे.. मराठी रॉकस्टारही जिथे रॉकच्या साथीनं अभंग सादर करतात.. आणि त्यांना मिळणारी दादही तेवढीचं निर्मळ असते... फक्त खंत एकच डोंबिवलीकर नाही ही खंत सतत फिरताना जाणवत राहिली.. आपल्या ठिकाणीही ही अशी मंडळी एकत्र जमावीत.. जगातला चांगुलपणा संपत असताना, कुठेतरी निर्मळपणे असा एक तरुणाईचा स्वयंस्फू्र्तीचा उत्सव साजरा होतो याचं मनापासून कौतुक वाटलं..
परतताना स्टेशनवरच्या ब्रिजवर एका भिकारणीला दोन रुपये देऊन, तिला हॅपी दिवाळी करणारा एक डोंबिवलीकर, ओळख नसतानाही आपला वाटला.. फडके रोडवर गेलो नसतो..तर एक वेगळा आनंद गमावला असता हे जाणवलं.. आणि एवढ्या हजारोंची ऊर्जा घेऊनच घरी परतलो..

1 comment:

Panchtarankit said...

@एरवी लोकमध्ये शिरताना आणि डोंबिवलीत उतरताना दिसणारी प्रचंड नकोशी गर्दी एवढी सुंदरही असू शकते.. हे जाणवलं..
वाक्य काळजाला भिडले राव
एक माजी डोंबिवलीकर
माझ्या जर्मन पत्नीला सुद्धा डोंबिवली , कैसास नाथची ची लस्सी आणि मोदार्ण केफे आवडते .दर वेळी भारतभेटीत आमची डोंबिवालीवारी ठरली असते.