
पु. लंनी पानवाला लिहल्यानंतर, आता खरतरं काही वेगळं लिहायला शिल्लक नसलं तरी फूलचंद रिमझीम हे एक असं पानामधलं जबरदस्त आकर्षण आहे की मी त्याच्याबाबत लिहण्यापासून स्वतला रोखूच शकतं नाही.. बरं हे पान आहे कुठलं हे तरी विचारा... हे पान पुण्यनगरीच्या पंचक्रोशी परिसरात प्रचंड फेमस आहे... पुण्याच्या कोणत्याही चांगल्या पानपट्टीवर गेलात तर तर पानवाल्याकडे एकाच प्रकारची प्रचंड पानं तो लावत असताना हमखास दिसणारचं... आणि तुम्ही त्याला फूलचंद मागून पहाच की तो त्या-त्या पानवाल्याच्या कुवतीप्रमाणे कुठे फ्रिजमधून तर कुठे थंड बर्फाच्या डब्यातून हे पान तुमच्या हातावर ठेवणार नाही तर नाव बदलायला आपण तयार...
मी गेल्या चार पाच किंवा त्याच्याही आधीपासून या पानाचा चाहता आहे.. पहिल्यांदा मला आठवत नाही पण कधीतरी पुण्यात भावाकडे गेलो असताना त्याच्या तोंडून मी या पानाचं वर्णन ऐकलं आणि ट्रायही केलं.. त्यावेळी सवय नसल्यानं पान खाल्ल्यावर थोडं गरगरलंही.. पण मग हळूहळू पान खाण्यात मुरत गेल्यानं या फूलचंदनी मला जबरदस्त वेड लावलं..(जरा अतिशयोक्ती वाटेल खरी पण आहे बाबा..) .. म्हणजे चार पाच वर्षांपूर्वी आम्ही केलेल्या चांदा ते बांदा कार्यक्रमात तर प्रत्येक ठिकाणी त्या-त्या प्रकारची पानं खाण्याची आम्ही एकमेकांत जणू काही स्पर्धाच केली होती म्हणा ना..
यातूनच हे पान खाण्याची सवय जडली.. आमच्या काही मित्र मंडळींनाही हळूहळू या पानाचा नाद लागलाच.. आमचे एक बंधुराज म्हणतात की एका हाफ क्वार्टरची किक एका पानात आहे ते म्हणजे फूलचंद... आता बोला.. मुंबईकरांना खरतरं या पानाच्या गोडीचं मह्त्व कळणार नाही.. मुंबईत किंवा इतरत्र तंबाखूचं पान म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते 120 किंवा 120-300 मात्र.. या पानांच्या कडवट चवीपेक्षाही मसाला पानाच्या चवीवर जाणारं आणि मसाला पान नसणारं पान म्हणजे फूलचंद रिमझीम..
पान खाणं हे व्यसन आहे असं मी म्हणणार नाही, मात्र पान खाणं हा शौक आहे, असं मी मानतो... आणि आपल्या जगण्यात असे काही थोडके आणि कमी अपायकारक शौक ठेवायला हरकत नाही, असंही म्हणायला हरकत नाही.. पुलंनी जेवढ्या ठामपणे पानवाल्यात लिहलयं त्याप्रमाणे या सर्व प्रकाराचं समर्थन करता येणार नाही, मात्र मसाला पान तयार करायला खरं तर पानवाल्यालाही आवडत नाही..विचारा हवं तरं.. कारण या पानासाठी त्याला लागणारी मेहनत ही जास्त असते आणि या पानांची गि-हाईकही आठवड्याकाठी (सुट्टीच्या दिवशी) किंवा महिन्याकाठी (पगारांवर) अवलंबून असतात. त्यामुळेच नेहमीच्या पानपट्टीच्या गादीसमोर उभं राहिल्याबरोबर पानवाल्याने आपलं पान न विचारता लावणं यात खरी रंगत आहे.. अगदी सुपारी कोणती याच्यासकट...
तसं गेल्या काही वर्षांपासून पानं खाण हे खरतरं कमीपणाचं मानलं जाऊ लागलय.. सिगरेट चालते मात्र अगदी सणासुदीच्या जेवणानंतरच पान खावं असा एक पायंडा पडलाय.. त्यामुळे डाऊन मार्केट झालेल्या पानाला आता केवळ मुंबईत तरी भय्येच वाली असल्याचं दिसतं... पण पान खाणं हा शौक आहे, असं मानून पान खाणा-या पुणेकरांचं मला नेहमीच कौतुक वाटतं.. एखाद्या ढाब्यावर किंवा हॉटेलात जेवण झाल्यावर जेवणाचा स्वाद फुलचंदसह रिचवित पिचका-या मारणा-यांचा आनंद शब्दात काय वर्णन करायचा... मुंबईत दररोज आपल्या कामात गढलेल्या आणि ऑफिस पॉलिटिक्स किंवा स्पर्धेच्या मा-यात असणा-यांना या आनंदाची कल्पना काय येणार.. तसं सगळ्याच पुणेकरांनाही याचा आनंद घेता येत असेल असंही नाही म्हणा..मात्र यासाठी ना माणसाला मुंबईकर असावं लागत ना पुणेकर.. तर माणसाचं आवर्जून पानावर त्याहीपैक्षा शौक करण्यावर प्रेम असायला हवं.. तरच याची गम्मत तुम्हा आम्हाला समजू शकेल..