Sunday, November 13, 2011

मनाचा ठाव घेणारं 'देऊळ'







आत्तापर्यंत धर्म आणि देव याबाबत जाहीर घेण्यास कुचराई करणा-या महाराष्ट्रात असा एक मराठी चित्रपट निर्माण व्हावा... ज्यानं आपल्या श्रद्धेलाच तडा जावा.. असा काही अनुभव मला काल 'देऊळ' सिनेमा पाहताना आला.. बरं फक्त एवढचं याचं वैशिष्ठ्य नाही.. ग्रामीण महाराष्ट्र.. त्यातला बरोजगार युवक.. त्याच्या रिकाम्या वेळाचा राजकारणी आणि इतर अविवेकी गोष्टींच्या माध्यमातून होणारा दुरुपयोग.. सिनेमाच्या फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफमध्ये जाणवणारे विरोधाभास.. अंगावर येणारं आणि कुणाच्याही विरोधात नसलेलं दत्ता दिगंबरा हे गाणं.. आमदार, स्थानिक पुढारी यांच्या वरचष्म्यात असलेली उदा. सरपंचांची भूमिका.. अण्णांसारख्या तत्ववेष्ट्याची सिनेमातली मनाला स्पर्शणारी मात्र अचानकपणे गायब होणारी भूमिका.. नायकाचा आक्रोश अशा कितीतरी गोष्टी ज्या कधीच विसरु शकणार नाहीत अशा..
सर्वात पहिल्यांदा अशा संवेदनशील विषयावर कुणालाही न दुखावणारा (अगदी देवही निवडून घेतलेला) असा चित्रपट इतक्या धीटपणे सिनेमात मांडणा-या सर्वच टीमचं मी मनापासून कौतुक करतो.. दुसरं अप्रतिम कास्टिंग.. कुठल्या भूमिकेसाठी कोण माणूस आणि तोही मराठीतला सर्वोच्च असाच हे निवडण्याबाबत धन्यवाद.. खरं सांगतो मनापासून गेल्या कित्येक वर्षांत म्हणजे माझ्या आठवणीत सुमित्रा भावे आणि सुनील सुखथनकर यांच्या 'वास्तुपुरुष' नंतर खरचं ताकदीचा सिनेमा असं ज्याचं वर्णन करता येईल तो देऊळ.. ज्यात केवळ आशय नाही.. नैमत्तिक नाही.. अनेक जुन्या रुढी उलगडणारा अनेक नवं संचित देणारा असा सिनेमा.. व्वा व्वा.. क्या बात है !
आता मुख्य सिनेमाविषयी .. अगदी पहिल्या फ्रेमपासून अगदी नावं सुरु होण्यापासून ते अगदी शेवटच्या मूर्ती विसर्जनापर्यंत आणि त्यानंततरच्या शांततेत साकारलेल्या काही निसर्गाच्या फ्रेमपर्यंत हा सिनेमा तुम्हाला घट्ट धरुन ठवतो.. कथानकाची सुरुवात..गिरीष कुलकर्णींचा वळूप्रमाणेच सरस अभिनय.. त्याचा त्याच्या गाईसाठी तुटणारा जीव.. गाव.. त्यातली बेरोजगार मंडळी.. नाना.. त्याची बायको सोनाली.. त्याचा महत्वाकांक्षी पुतण्या.. त्यांचा बिनकामाचा पण काहीतरी कार्यक्रमाच्या शोधात असणारा ग्रुप.. त्यातला कवी.. पत्रकार.. फाट्यावर असणारं मात्र गावापासून लांब असणारं त्यांची ती नेहमीची टपरी.. मोबाईलच्या रिंग टोन्स.. मोबाईलवर सुरवातीला लांबूनच बोलतानाची नानाच्या पुतण्याची सवय.. त्याची साजनची रिंगटोन.. त्याचं एज फ्रेंड, एज सरपंच, एज गावकरी ही स्टाईल.. ट्रिपल सीट सर्रास होणारा प्रवास.. त्या मंडळींचं समरसून बीपी पहाणं.. त्यातला बेव़डा मास्तर.. त्याची त्याच्या बायकोशी मुलासाठी होणारी होणारी जुगलबंदी.. बायको रडायला लागल्यावर त्याची होणारी घालमेल.. गिरीषची आई.. त्याची प्रेयसी.. त्यांचे एकमेकांशी असलेले विनोदावर जाणारे पण प्रत्यक्षात श्रध्देवरच अघात करणारे सवाद.. त्यात सुंदर पावा वाजवणारे आणि गावापेक्षा अधिक माहिती आणि सखोल असेलेले अण्णा.. गिरीश आजारी पडला असताना त्याच्या डोक्याशी येऊन तोच तोच संवाद साधणा-या बायकांचा स्वभावविशेष.. गावातल्या महिला सरपंचांची प्रत्यक्ष स्थिती.. झेंडावंदनाला होणारी धावपळ.. सरपंचावर स्थानिक नेत्यांचा आणि आमदारांचा स्थानिक नेत्यांवर असलेल्या प्रभाव.. ग्रामीण भागात पत्रकारांची मोठी आणि आर्थिक हितासाठी असलेली भूमिका.. हे सर्वच त्यांच्या त्यांच्या पात्रांची सखोल ओळख , ग्रामीण महाराष्ट्रतलं अस्सलं जीवन.. त्यातलं नैराश्य.. आशेचे किरण... याचा धगधगता प्रवास पण काहीसा विनोदाच्या अंगानं जाणवणारा प्रवास पहिल्या सत्रात घडतो..
एका साध्याभोळ्या माणसाच्या दृष्टीकोनाचा राजकीय फायदा घेण्यासाठी मंदिर बांधण्याचा निर्णय झाल्यानंतर दुस-या पर्वात गावात आलेला बाजारीपणा.. मोबाईलच्या रिंगटोन्स ते घरातलं सामान.. कपडे.. फर्निचर.. बांधकाम.. बाजारीपणामुळं आलेला निगरगट्टपणा.. गावक-यांची हरवलेली शांतता.. कुटुंबात आलेला व्यावसायिकपणा.. हे सगळं दुस-या पर्वात छान जाणवून जातं.. त्यातही अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यानं हा फरक अगदी स्पषटपणे जाणवत राहतो.. गिरीषचं करडी गायीवर असणारं प्रेम.. तिचं या धंद्याच्या नादात देवात झालेलं रुपांतर यानंतर त्याचा होणारा उद्वेग. तिच्या देखभालीसाठी त्याचा तुटणारा जीव.. आणि या पार्श्वभूमीवर हे सगळं सत्य समोर येत असताना दत्ता दिगंबरा हे गाणं.. अगदी अंगावर आल्याशिवाय राहवत नाही..
याचा अर्थ सिनेमात हे सगळं रचणा-या मंडळींना कुणी खलनायक म्हणू शकत नाही.. त्यांच्या आणि गावाच्या विकासासाठी ही त्यांची योग्य भूमिका असल्याचा नाना आणि दिलीप प्रभावळकर यांचा संवाद.. अण्णांच्या भूमिकेत असलेल्या दिलीप प्रभावळकरांची तगमग.. शेवटी देवालाच कोंडल्यामुळं आणि करडी गायीच्या वियोगानं घायाळ झालेल्या गिरीषचा एकतर्फी संघर्ष.. त्याला वेडाच्या भरात भेटलेला नासीर.. व्वा व्वा त्या भूमिकेसाठी नासीरची निवड करण्याचं दाखवलेलं वेगळेपण.. त्याचं मूर्ती घेऊन पसारं होणं.. त्याचा देवाशी साधलेला भाबडा पण मोलाचा संवाद.. आणि मूर्ती विसर्जनावेळी दुसरीकडं होत असलेली मूर्तीची नवी प्रतिष्ठापना.. म्हणजे आता बाजार सुरुच राहणार .. याचा जाणारा संदेश.. आणि दुसरीकडं भाबड्या गिरीषच्या मनातल्या श्रद्धेचं, देवाचं झालेलं विसर्जन.. हे सगळचं तुम्हाला अंतर्मुख करायला लावणारं आहे.. एकीकडे गोंगाट.. एकीकडं शांतता.. मात्र तीही सखोल तत्ववेत्त्यासारखी.. वा.. बहोत खूब..
या सिनेमात एवढे दर्जेदार अभिनेते असूनही कुणाचा एकट्याचा अभिनय लक्षात राहत नाही.. याचं कारण टीम वर्क.. आणि प्रत्येक भूमिकेला मिळालेलं परफेक्ट स्थान.. सिनेमा संपल्यानंतर एक वेगळीच अंतर्मुख करणारी, आपल्या श्रद्धांना तडा देणारी.. त्यावर उपहासात्मक विडंबन म्हणून कुठेतरी आत विचार करायला लावणारी( प्रत्येचाच्या कुवतीनुसार ) प्रोसेस घेऊनच प्रेक्षक बाहेर पडतो.. आणि मला वाटतं हेच या सिनेमाचं यश आहे..
या संघर्षात तुमची घालमेल होते, तुम्ही रडता.. हसता.. पण तुम्हाला आत हे कुठेतरी अंतर्मुख करत रहातं.. आपल्या आजूबाजूला आणि आपणही काय करतोय याची जाणीव होत राहते.. हेच याचं गमक आहे.. सध्याच्या धावपळीच्या जगात आणि स्वतंत्र कुटुंबाच्या पद्धतीत कामातही शांतता मिळत नसताना, जगण्यातली धावपळ आणि गुंता सडवण्यासाठी आम्ही नवी सोफिस्टिकेटेड उपाय शोधून काढलेत.. आम्हाला मानसिक शांततेसाठी माऊली, तुकामाई किंवा पंढरपुरात जाण्यापेक्षा शिर्डी, शिंगणापूर, अक्कलकोट, गोंदवले, शेगाव, बांद्रा असे आमचे आम्ही उपाय शोधून काढलेत.. त्याच्यावर जाऊन अनेक बुवाबाजांची संगत आहेच.. त्यात लालबाग, सिद्धीविनायक, दगडूशेट साराख्यांची भर आहेच.. याशिवाय काशी, अयोध्या. प्रयाग, चार धाम, बारा ज्योतिल्रिंग, अष्टविनायक, अमरनाथ, लागलचं तर वैष्णोदवी, मानससरोवर.. याप्रत्येक तिर्थक्षेत्री जाऊन शांतता शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.. प्रत्यक्षात मात्र वास्तव काय आहे हे पाहण्याकडं आमचा कल नाहीच.. मग अशा अशांततेत तुमच्या मनातल्या श्रद्धेवरच प्रघात करणारा सिनेमा देऊन नक्कीच अनेक रंगांनी , उत्तम कलाकृती म्हणून , उत्तम आशय म्हणून अतिशय समृद्ध आहे.. एवढी हिम्मत दाखवून तुम्ही हे मांडलत.. त्यासाठी कष्ट घेतलेत.. हेच माझ्यासारख्या गरीब पामर मराठी प्रेक्षकासाठी समाधानाची बाब आहे.. म्हणून संपूर्ण टीमला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद..

Wednesday, October 26, 2011

डोंबिवलीकरांचा ‘फडके’ उत्साह



नाक्यावरची मित्र मंडळी नेहमीचीच... मात्र अशा अनेक नाक्या नाक्यांवरचे ग्रुप्स.. त्यात नुसतेच मित्र नव्हेत तर असंख्य मैत्रिणीही... तेही नव्या कपड्यांत.. नव्या उत्साहात... अशा हजारो जणांची एक एकत्र मैफल तीही रस्त्यावर.. रस्ता अडवून... असं अनुभवलंय कधी.. नाही मी पण नव्हतं अनुभवलं.. पण आज डोंबिवलीच्या फडके रोडवर लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं हजारोंच्या संख्येनं जमलेल्या तरुणाईचा उत्साह अनुभवला आणि दिवसभर तोच मनात घर करून राहिला... नव्हे फडके रोडवर जाण्यानं दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला...

गेल्या सात-आठ वर्षांपासून डोंबिवलीच्या फडके रोडवरच्या गुढीपाडवा आणि दिवाळीच्या गर्दीविषयी ऐकत होतो..टीव्हीवर पाहत होतो... त्यात काय नुसतीच गर्दी आणि लफडी अशी डोंबिवलीकर नसल्यानं असलेली एक उपेक्षित भावनाही त्यामागं होती.. मात्र आज या एकत्रित उत्सवाची काय मौज आहे.. नुसतचं एकत्र जमण्यापेक्षाही त्यातल्या जिव्हाळ्याची जाणीव झाली.. आणि इतकं वर्ष आपण आपल्या ठिकाणी हे मिस करत आलो.. असं खरोखरचं जाणवलं..

गणपती मंदिराच्या परिसरात आणि फडके रोडवर जमलेली हजारोंची गर्दी.. गर्दीचं सरासरी वय २० ते ४० वर्ष.. अनेक वर्षांनी एकमेकांच्या होणाऱ्या भेटी.. गर्दीतही मी इथे मॉर्डन कॅफेजवळ आहे.. तू तिकडे काय करतोयेस.. मी इथे मंदिराच्या बाहेर आहे.. असे आपुलकीनं एकमेकांसाठी घणघणणारे मोबाईल.. जिव्हाळाच्या मित्रांच्या गळाभेटी.. मैत्रिणींची आपुलकीनं होणारी चौकशी.. सध्या काय चाललंय, अशी होणारी विचारपूस.. काही जणांची गर्दीतही चाललेली, मात्र ग्रुपपुरतीच मर्यादित असलेली भंकस.. एवढी हजारो माणसं.. कोणत्याही निमंत्रणाशिवाय, केवळ आपुलकीच्या नात्यानं जमा होतात.. हे अप्रूप वाटलं..
सगळ्यात महत्त्वाचं जाणवलं तो म्हणजे निवांतपणा.. एरवी रहदारी आणि व्यवहारांनी गजबजलेल्या फडके रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा नाही, अशी परिस्थिती.. सगळे व्यवहार ठप्प.. फक्त एकत्र जमलेली मंडळी आणि त्यांच्या एकमेकांशी चाललेल्या गप्पा.. एरवी लोकमध्ये शिरताना आणि डोंबिवलीत उतरताना दिसणारी प्रचंड नकोशी गर्दी एवढी सुंदरही असू शकते.. हे जाणवलं..
डोंबिवलीचं गणपती मंदिर हे या सगळ्यांना जोडणारं एक स्थान.. दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंगस्नानानंतर मंदिरात दर्शनाला येण्याची प्रथा.. पण त्याचं असं उत्साहात रुपांतर झालय... एरवी दिवाळी हा आपल्यापुरता, आपल्या कुटुंबाकरता फार तर आपल्या काका, मामा अशा नातेवाईकांसाठी साजरा होणारा सण इतक्या मोठ्या गर्दीत आपुलकीनं, जिव्हाळ्यानं साजरा होऊ शकतो.. हेच अधिक आवडलं.. आपआपल्या शहरातंही आपण असे एकत्र येऊ शकत नाही का.. असा प्रश्नही मनाला पडला..
एवढी गर्दी असतानाही या गर्दीला एक स्वयंशिस्त होती.. एरवी गुढीपाडव्याला इथं जमणारी मंडळी ही कुठल्यातरी संस्थांशी संबंधित असतात.. किंवा त्या मागे एक मोठी यंत्रणा कार्यरत असते..मात्र नरक चतुर्दशीच्या दिवशी या ठिकाणी जमलेली ही गर्दी स्वयंस्फूर्तीची असते.. गर्दीत काही जण काळे-गोरे असणारच मात्र ती सर्वांना त्रासदायक नक्कीच नव्हती.. एवढ्या तुडुंब गर्दीतही रस्त्यावरच्या मोठ्या रांगोळीचं महत्त्व सगळ्यांनाच माहित होतं.. आणि एवढ्या गर्दीतही फटाक्यांच्या माळा फुटल्यानंतरही कोणीही त्याबाबत साधा आक्षेप घेत नव्हतं..सगळेचजण एकमेकांच्या आनंदाच्या आड येणार नाहीत याची दक्षता स्वत:हून घेत होते..
जगात नाती विरळ होत असताना.. संवाद साधावा अशी माणसं शोधावी लागत असताना केवळ एकमेकांसाठी वर्षभरातून तरी फडके रोडवर भेट होईलच या आशेपोटी हजारो मंडळी इथं आवर्जून एकत्र येतात.. यातली काही मंडळी चांगल्या हुद्द्यावर असतील.. एरवी धावपळीतही असतील.. पण गाड्या बाजूला ठेऊन पायी फिरून या आपुलकीच्या भेटी नक्कीच वर्षभरासाठी पुरून ठरणाऱ्या असतील.. उदा.. एखादी राहून गेलेली प्रेमाची भरलेली जखमही याच गर्दीत कुठेतरी कडेवरच्या मुलासह दिसली.. आणि आपलं लग्नही झालेलं असलं तरी तिच्या त्या एका लूकमुळं पुढच्या वर्षभराची उमेद नक्कीच जखमेवरच्या खपलीसह मिळत असेल.. नाही का..
इथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही सादर होतात आणि त्यातही तोल ढळू न देण्याचा प्रयत्न प्रकर्षानं दिसून येतो.. हे शहराच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारं आहे.. मराठी रॉकस्टारही जिथे रॉकच्या साथीनं अभंग सादर करतात.. आणि त्यांना मिळणारी दादही तेवढीचं निर्मळ असते... फक्त खंत एकच डोंबिवलीकर नाही ही खंत सतत फिरताना जाणवत राहिली.. आपल्या ठिकाणीही ही अशी मंडळी एकत्र जमावीत.. जगातला चांगुलपणा संपत असताना, कुठेतरी निर्मळपणे असा एक तरुणाईचा स्वयंस्फू्र्तीचा उत्सव साजरा होतो याचं मनापासून कौतुक वाटलं..
परतताना स्टेशनवरच्या ब्रिजवर एका भिकारणीला दोन रुपये देऊन, तिला हॅपी दिवाळी करणारा एक डोंबिवलीकर, ओळख नसतानाही आपला वाटला.. फडके रोडवर गेलो नसतो..तर एक वेगळा आनंद गमावला असता हे जाणवलं.. आणि एवढ्या हजारोंची ऊर्जा घेऊनच घरी परतलो..

Saturday, September 24, 2011

अण्णांपासून मोदींपर्यंत..

गेल्या चार पाच वर्षांपूर्वी लोकलमध्ये प्रवास करत असताना भाजपचे (तेव्हाचे की पूर्वीचे) विधानपरिषद सदस्य अशोकराव मोडक फर्स्ट क्लासच्या डब्यात भेटले होते.. (विशेष म्हणजे आमदार असूनही अशोकराव लोकलमधून प्रवास करत होते) त्यांना मी दोन प्रश्न विचारले.. एक आणीबाणीनंतर किंवा स्वातंत्र्योत्तर काळानंतर देशातलं संस्थात्मक काम कमी झालय का?, ( म्हणजे सरकारव्यतिरिक्त इतर स्वयंसेवी संस्था एनजीओ नव्हेत.. तर देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा धरुन सामाजिक कामात उतरलेल्या संस्था ) आणि
दुसरा प्रश्न मोडक हे रा. स्व. संघाशी संबंधित असल्यानं की संघटनेला नवी माणसं मिळेनाशी झालीयेत का ?.. त्यांनी नेहमीच्या संघआच्या पद्धतीनं डॉक्टर आणि गुरुजींवर आणत हा विषय संपवला, मात्र ठोस उत्तर त्यांच्याकडेही नसावं..

स्वदेशी जागरण मंचाचे राष्ट्रीय संघटन मंत्री एकदा मला हैद्राबादच्या प्रवासात भेटले होते त्यांना मी हाच प्रश्न विचारला होता.. त्यांचं नाव आता विस्मृतीत गेलय. ( मोडकांना भेटण्यापूर्वी दोन वर्षांपूर्वी ) तर ते म्हणाले बरोबर आहे.. पण त्यांनी मला प्रमोद महाजनांचं उदाहरण दिलं होतं.. ते म्हणाले प्रमोदजी भाजपचे बडे नेते असणं तुम्हाला योग्य वाटतं का.. ( म्हणजे त्यांचा प्रमोदजींना थोडक्यात विरोध असावा ही शक्यता) .. आणि या सगळ्याचं समर्थन करत म्हणाले होते की संघटनेत नेहमी फ्लोटिंग पॉप्युलेशन असतं त्यामुळं नवी माणसं येईपर्यंत जुन्यावर भागावावं लागणारच..
हे सगळं आत्ता सांगण्याची गरज म्हणजे अण्णांच्या आंदोलनानंतर देशासाठी काहीतरी करावं.. अशी इच्छा असणारे बरेच जण आहेत हे लक्षात आलं... खरे-खोटे हे नंतर ठरवू मात्र ही व्यवस्था बदलण्याची इच्छा असलेले अनेक तरुण या आंदोलनात निर्विवाद सहभागी झाले.. मग त्याची कारणं काहीही असोत... प्रसंगी अण्णांच्या सांगण्याप्रमाणे तुरुंगात जाण्याची यातल्या कितीजणांची तयारी होती, याबाबत साशंकता असली, किंवा यात सहभागी होणा-या व्यक्तिंच्या सद्भावनेबाबत हेतू असला, तरी अण्णांना दिल्लीसह देशभरात जनमानसातून खूप काही ठोस पाठिंबा आहे, हे चित्र रंगवण्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया यशस्वी ठरला.. यामुळं आधीच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर अडचणीत सापडलेल्या युपीए-2 सरकारसमोरच्या अडचणी वाढल्या.. वगैरे..वगैरे..
अण्णांच्या आंदोलनाचं फलित काय, तर यानिमित्तानं देशासाठीही विचार करायचा असतो, हे आत्ममग्न असलेल्या मध्यमवर्गियांना समजलं.. तसचं एक फाटका माणूस संपूर्ण देशाच्या यत्रणेला आव्हान देऊ शकतो हेही अण्णांच्या आंदोलनानं पुन्हा एकदा दाखवून दिलं... तिसरं महत्त्वाचं मत न देणारा एक मध्यमवर्गीय समाज या निमित्तानं जागृत झाला.. या आंदोलनाची जेपींच्या आंदोलनाबरोबर जरी तुलना केली असली किंवा संघाच्या पाठिंब्याची किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे आंदोलन यशस्वी झाल्याची जरी चर्चा झाली असली, तरी मी आधी म्हटल्याप्रमाणे देशाबाबत कुणाचालाच काही वाटतं नाही, असं नसल्याचं या आंदोलनातून दिसून आलं..
अण्णांचं आंदोलन संपल्यानंतर दोन तीन दिवसांच्या प्रसिद्धीनंतर अण्णा पुन्हा अडगळीत किंवा चांगल्या शब्दात राळेगणात गेले खरे.. पण यानिमित्तानं भाजपला जोर चढला.. देशात निर्नायकी अवस्था असताना आता या पोकळीचा फायदा कुणाला मिळणार याचे आडाखे बांधण्यास आणि त्यावर दावे सांगण्यास चढाओढ सुरु झाली.. अडवाणी यांनी जाहीर केलेली रथयात्रा किंवा सुप्रीम कोर्टाच्या साध्या दिलाशानंतर मोदींनी केलेला तीन दिवसांचा उपोषणाचा इव्हेंट यातून आता भाजपात सुंदोपसुंदी रंगू लागल्याचं समोर आलं...
खरतरं अण्णांचं आंदोलन सुरु असतानाच एक दिवस मोदींना दिल्लीत बोलवून त्यांची गडकरींसह एक बैठक घेऊन, एक साधी पत्रकार परिषद भाजपनं घडवून आणली असती तरी मोदींच्या पंतप्रधानपदाच्या चर्चेला ऊत आला असता.. यावेळी मोदींनी एका रथयात्रोची घोषणा करावी अशी माझी सूचना होती.. हे मी माझ्या काही सहका-यांपाशी बोललोही होतो.. त्यानंतर अडवाणींनी रथयात्रेची घोषणा करुन आपण चर्चेत असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं.. तर अण्णांचीच आयडिया वापरुन आपणही प्रसिद्धी मिळवू शकतो हे मोदींनीही दाखवून दिलं. खरतरं एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांला सुप्रीम कोर्टानं दिलेल्या साध्या दिलाशानंतर
( म्हणजे याला दिलासा म्हणायचं की नाही यावरही वाद आहेत) त्याचा लगेच पंतप्रधानपदासाठी दावा सांगण्याचं दुर्देवी काम मीडियाला करावं लागलं... याच मीडियानं 2002 साली गुजरात दंगलीनंतर मोदींना टीकेचं प्रचंड लक्ष्य केलं होतं... मोदींनी मध्यंतरी गुजरातमध्ये केलेल्या कामाचं किंवा सध्याच्या निर्नायकी अवस्थेचं हे फलित असावं.. यात विजय मोदींचाच झाला..
अण्णांच्या आंदोलनानंतर सरकारविरोधात वातावरण तापलेलं आहे, 2 जी घोटाळ्यात तर आता चिदंबरम आणि पंतप्रधानांचं नावही येऊ घातलय.. सोनिया गांधी आत्ताच कॅन्सरसारख्या दर्धर शस्त्रक्रियेनंतर देशात परतल्या आहेत... आणि अण्णांच्या आंदोलनानं कितीही जनमानसानतला राग पेटलेला असला, तरी याचा फायदा अण्णा निवडणुकांत घेऊच शकत नाही हे वास्तव आहे.. कारण आंदोलन आणि राजकारण किंवा निवडणुकांची गणित वेगवेगळी असतात हे नक्कीच... आता याचा फायदा भाजपलाच मिळणार आहे.. कारण सध्यातरी ठोस पर्याय दिसेनासा आहे.. डाव्यांची ताकद प. बंगालच्या पराभवानंतर घटलेली आहे, तर दुसरा कोणताही सबळ राजकीय राष्ट्रीय पक्ष सध्या अस्तित्वात नाही.. फक्त त्यांनी अंतर्गत सुंदोपसुंदी मिटवून ही शेवटची संधी घेतली तर ठीक... आत्तापासूनच मोर्चेबांधणी केली नाही तर पुन्हा गेल्या दोन निवडणुकांपेक्षा भाजपची कठीण परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही..
अण्णांचं आंदोलन ते मोदींची पंतप्रधानपदाची उमेदवारी हा असा सगळा प्रवास आहे.. मोदींची उमेदवारी किती योग्य वा अयोग्य हे जनता ठरवेलच.. मोदीही दंगलींपेक्षा राष्ट्रीय विकासाकडेच पाहतील.. मात्र अण्णांच्या आंदोलनाचं हे असं फलित होणं, हा कुठला न्याय आहे.. .. हीच लोकशाही आहे काय ?

Sunday, March 13, 2011

रविवारची फिस्ट...











शनिवारची उशिराने झालेली रात्र... रविवारची पहाटे 10 पर्यंतची साखरझोप.. चहाच्या पेल्याबरोबच मित्रांचे आलेले फोन... आणि मग विनाअंघोळीची बाईकवरुन किंवा कारमधून लांबवर कुठेतरी मारलेली रपेट.. मग सगळ्या चर्चा , गंमत संपल्यानंतर पोटात झालेली भूकेची जाणीव... आणि मग कुठेतरी फक्कड ठिकाणी
नाश्ता म्हणताना सगळयांनीच आटोपलेलं जेवण... रविवारच्या सुखाची कल्पना ही माझ्यासाठी अशी आहे.
रोजच्या धकाधकीत दोन-तीन तास लोकलने झालेला प्रवास आणि मुंबईचं तेचतेच दर्शन, यामुळं मरगळलेल्या मनाला पुन्हा जिवंत करणारी ही भटकंती आणि नवे विचार यासारखी गंमत नाही.. शनिवारी रविवारी या दोन दिवसाच्या सुट्टीत लोकलने मुंबईच्या दिशेने प्रवास करायचा नाही, असा आमच्या काही मित्र मंडळींचा पण आहे.. तसचं आठवड्यात कामाच्या वेळी कुठेही म्हणजे मुंबईत, ठाण्यात, नवी मुंबईत, पुण्यात, नाशकात अशा आसपासच्या ठिकाणी असलेली ही मंडळी शनिवारी आणि रविवारी मात्र न चुकता बदलापूरकडं धावत असतात.. एरवी सकाळई दहाच्या सुमारास लोकलनं रिकामं केलेलं बदलापूर शनिवारी आणि रविवारी मात्र फुलून आलेलं असतं. प्रत्येकाच्या ठरलेल्या नाक्यावर कोणत्याही घरच्या कपड्यांत तासनतास एकमेकांशी सिगरेटी, चहांची देवाणघेवाण करत गप्पा मारत बसलेली तुम्हाला नक्की दिसतील.. बर एरवी यातली बरीशची मंडळी त्यांच्या त्यांच्या कामाच्या ठिकाणी चांगल्या पोस्टवर असलेली..तरीही त्यांची कोणतीही भीडभाड न ठेवता शनिवारी आणि रविवारी मात्र हे बदलापूर सुख लुटायला सगळेच येतात.. यामागं असतं बदलापूरचं प्रेम.. एरवी कोणीही बदलापूर लांब म्हणून त्याला टाकून बोललेलं या मंडळींना आवडत नाही, कारण त्यांना बदलापूरची मजा ठाऊक असते..
शहरी आणि ग्रामीण अशी दोन्ही रुपं धारण केलेलं बदलापूर म्हणूनच मग सगळ्यांचं वीक एन्ड डेस्टिनेशन असंत.. कुठेतरी तळ्यावर, मुळगावच्या खंडोबाच्या मंदिरात, बारवी डॅम परिसरात, तिथून पुढे टिटवाळा ते थेट माळशेजपर्यंत, तर कुठे कोंडेश्वर, कुठल्यातरी रेनी रिस़ॉर्टवर, वांगणी, नेरळ, कर्जत ते पार खंडाळा लोनावळ्यापर्यंत बदलापूरकरांना फिरायला फार आवडतं.. आणि मग त्यातही कोणी ऑफिसची मित्र मंडळी आली तर धम्मालच.. बदलापूरकरांमध्ये असचं एक आवडतं ठिकाण म्हणजे मुळगाव.. बदलापूरपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावानं अजून आपलं गावपण टिकवून ठेवलय.. तशी आजूबाजूची गावही आहेतच, मात्र इथला खंडोबा आणि मामांचं हॉटेल हे बदलापूरसाठी मुख्य आकर्षण..
बारवी डॅमकडे फिरायला गेलेल्या सगळ्याच मंडळीचे पाय या टपरीवजा ह़ॉटेलकडे नक्की वळतात.. मोठमोठ्या चारचाकी गाड्या इथं थांबतात.. आणि मग सुरु होते खाद्ययात्रा.. गरमागरम गरम वडे आणि त्यासोबत असणारा ठेचा हे या ठिकाणचं खास वैशिष्ठ्य.. त्याचबरोबर मग जबरदस्त तर्री असलेली मिसळ वगैरै सोबतीला आलचं.. मुख्य अट एकच तिखटं खाण्या-यांनीच या ठिकाणी यावं..
उकडलेल्या बटाट्यात हळद, कोथिंबीर, थोडासा ठेचा याचं तयार केलेलं मिश्रण, डाळीच्या पिठातून काढून तेलाच्या कढईत टाकलेले वडे आणि गि-हाईकांची वर्दळ आणि मामांकडून गि-हाईकांचं होणारं स्वागत.. यामुळं एक मजाच याठिकाणी असते.. बरीच मंडळी या ठिकाणी वड्यांवर आणि रश्यावर ताव मारत बसलेले असतात.. पूर्वी लहान असलेल्या या हॉटेलचा आता बराच विस्तार झआला आहे. पूर्वी ठेचा आणि वड्यापुरतीच मर्यादा होती, आता त्यात चिकन आणि मटन थाळीही आली आहे.. पण एवढं होऊनही मुख्य वड्याकडे दुर्लक्ष झालेलं नाही आणि फारसा झगमगाटही आलेला नाही. त्यामुळे या वाटेवर आलं की इथं मंडळी हटकून थांबतातच..
मग मित्रांच्या गप्पा, मस्करीत पावांचा आणि वड्यांचा हिशेब ठेवणं अवघड जातं, बिसलेरीच्या थंड पाण्याच्या बाटल्या येतात.. उसळीच्या वाट्यान वाट्या येतच राहतात, तिखटं न खाण्या-याची खेचली जाते.. थोडसं हा हू करत का होईना, रुमाल काढत तोंड पुसतं मंडळी अक्षरश तुटून पडतात.. मग हा नाश्ता आहे हे भानही संपतं आणि मग या वड्यावर, ठेच्यावरच जेवण होऊन जातं.. हे कुणाच्या लक्षातही येत नाही.. इथला ठेचा तर टेस्ट करुन बघावा असाच.. ते त्याला चटणी म्हणतात पण आहे प्रत्यक्षात ठेचाच.. तेलानं माखलेल्या प्लेटमध्ये हिरव्या मिरच्यांचा हा ठेचाच या जेवणाला अधिक रंगत आणतो..
चला तर मग कधी येताय बदलापूरला या फिस्टचा अनोखा आनंद लुटण्यासाठी..

Thursday, February 10, 2011

असंच काहीसं आठवलेलं...

जालन्यात शेतकरी संघटनेच्या अधिवेशनाचा प्रसंग-
नांदेडात रिपोर्टिंग गेल्यावर काही दिवसांतच
जालन्यात शेतकरी संघटनेचं अधिवेशन कव्हर
करण्याचे आदेश मिळाले.. नियमाप्रमाणे तिथे
गेल्यावर लक्षात आलं, ते हे की एका चांगल्या
हॉटेलात पत्रकारांच्या निवासाची व्यवस्था केलेली.
अधिवेशनात म्हणजे शरद जोशी यांचे प्रवचन
ऐकण्यासाठी आलेला शेतकरी वर्ग....संध्याकाळी
बातम्या फाईल करुन परतण्याच्या विचारात असताना
पाहिलं तर स्टेडियममध्ये शेतकरी त्या थंडीतच
चुली पेटवून बसलेले..तिथेच स्वयंपाक, जेवण आणि
पुन्हा पुढचं दोन दिवसांचं अधिवेशन.. तशी फारशी
थंडी किंवा पाऊस नसला तरी मुक्काम मंडपात आणि
अधिवेशन स्थानीच.. स्वत:च्या पत्रकार असण्याची
आणि हॉटेलातल्या सोयींची लाज वाटली...
अमर हबीब हे या ठिकाणी भेटलेले मोठ्ठे कार्यकर्ते..
अत्यंत साध्या वेशातल्या या माणसानं पहिल्याच दिवशी मन
जिंकून घेतलेलं... तगमग होत असताना त्यांच्याकडे
गेलो आणि त्यांना सांगीतलं की हॉटेलात राहणं
अवघड आहे म्हणून, बॅग उचलली आणि आमच्या
जालन्यातल्या रिपोर्टरच्या घरी कॅमेरामनसह
रहायला गेलो... मनातून तेवढीच शांतता, किमान
आपण आपल्या पदाचा गैरवापर तर केलेला नाही..

नवीन पर्व के लीए...

नव्या वळणावर नवे संकल्प आणि
स्वत:लाच अधिक संघटीत करण्याचा प्रयत्न..
पाहुयात पुन्हा बुडी मारुन हाताला काय लागते का ते ?
कशा स्वरुपात त्याची जाहीर मांडणी चुकीची ठरेल..
आता तिशी ओलांडल्यावर गेल्या 10 कमावत्या
वर्षांचा हिशेब आणि नव्या आव्हानांना सामोरं
जाण्याची मानसिक तयारी.. ही 10 वर्ष
कष्टाची होती, पुढची स्थिरावल्यामुळे
कदाचित कमी कष्टाची असावीत...
मग आपल्या मुळच्या पिंडाकडे जाण्याचा
आता पुन्हा प्रयत्न करता येईल का...
वेळ अधिक सक्षमपणे वापरण्याचा प्रयत्न..
वगैरे वगैर...